दरवर्षी पावसाळ्यापूर्वी भंडारदर्यातील जंगलात, ही निसर्गाची रोषनाई दिसते. किर्रर... अंधारात रातकिड्यांच्या आवाजात, ही निसर्गाची रोषनाई भंडारदरा जंगलात दिसते. भंडारदरा, कळसुबाई, घाटघर परीसरातील जंगलात हे काजवे मोठ्या संख्येने दिसतात.
जंगलातील आंबा, उंबर, हीरडा, बेहडा, सादडा, जांभूळ अशा निवडक झाडांवरच काजवे चमकतांना दिसतात. त्यामुळे ही झाडे ख्रिसमस ट्री सारखे चमकू लागतात. त्यामुळेच एमटीडीसीनेही काजवा फेस्टीव्हल सुरू केलांय.
पावसाळ्याच्या सुरूवातीचा काळ, हा काजव्यांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे एकाच वेळी हजारो नर-मादी काजवे एकमेकांना आकर्षित करण्यासाठी आपला नैसर्गिक जैवप्रकाश असा प्रकाशमान करतात. मात्र काजवा महोत्सवामुळे काजव्यांच्या मिलनामध्ये अडथळे येत आहेत.
लोकमत या वृत्तपत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार, या महोत्सवात लाखो निसर्गप्रेमी सहभागी होतात. मात्र यावेळी ते अनेक नियमांचे उल्लंघन करतात आणि यामुळे काजव्यांच्या मीलन क्रियेत अडथळे निर्माण होतात, असे अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे.
पाऊस सुरू व्हायच्या काळात नर काजवे मीलनासाठी मादीला काजव्याला आकर्षित करण्यासाठी शरीरातून प्रकाशनिर्मिती करतात. मात्र काजव्यांच्या या मीलनकाळातच काजवा महोत्सव आणि सहलींचे आयोजन होते. याचा काजव्यांवर वाईट परिणाम होतो.
वन्यजीवांच्या अधिवासात रात्रीच्या वेळी घुसखोरी, टॉर्चचा वापर, मोठा आवाज, जेवण करून प्लास्टिक आणि इतर कचरा तेथेच फेकणे यामुळे काजव्यांच्या मीलन क्रियेत अडथळे येतात.
सावली, नेचर कन्झर्वेशन सोसायटी, कवजीय अभ्यासक अमोल जाधव यांनी लोकमतला सांगितले की, "काजवे प्रचंड संवेदनशील असतात. टॉर्चचा प्रकाश आणि आवाजामुळे त्यांच्या संवाद आणि संदेशवहन प्रक्रियेत अडथळे येतात. उडणारे काजवे पाहताना उडू न शकणाऱ्या त्यांच्या माद्या चिरडल्या जातात. स्थानिक पर्यावरणसुद्धा अशा महोत्सवांमुळे धोक्यात येते"