छोट्या पडद्याचा प्रसिद्ध शो बिग बॉस ओटीटी (Bigg Boss 15) 8 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. अनेक सेलिब्रीटींची नावं आता कन्फर्म झाली आहेत. त्यातीलच एक म्हणजे मराठमोळा अभिनेता राकेश बापटचं नावंही आता निश्चित झालं आहे.
राकेश बापट 'बिग बॉस 15' मध्ये दिसणार की नाही यावर बरिच चर्चा रंगली होती, मात्र राकेश आता बिग बॉसमध्ये झळकणार आहे. दरम्यान त्याने स्वतःहून याची कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही.
राकेशने मराठी आणि हिंदी दोन्हींमध्ये काम केलं आहे. अनेक प्रसिद्ध हिंदी मालिंकामध्ये तो झळकला होता. तसेच मराठी चित्रपटातही तो दिसला आहे.
राकेशने 2001 साली आलेला चित्रपट ‘तुम बिन’ मधून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली होती. याशिवाय राकेश ‘दिल विल प्यार व्यार’, ‘हीरोइन’, ‘कौन है जो सपनों में आया’ या चित्रपटांतही दिसला होता.
राकेश अनेक प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्येही दिसला होता. ‘सात फेरे’, ‘कुबूल है’, ‘बहू हमारी रजनीकांत’, ‘मर्यादा लेकिन कब तक’ अशा अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. तसेच त्याने 'आयना का बायना' या मराठी चित्रपटातून मराठीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो 'वृंदावन', 'सविता दामोदर परांजपे' अशा अनेक चित्रपटांत दिसला.
राकेश बापटने 2011 मध्ये भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेता अरुण जेटली यांची भाची रिद्धी डोगरा सोबत लग्न केलं होतं. पण २०१९मध्ये ते वेगळे झाले.
राकेश बापटचा घटस्फोट का झाला याविषयी जास्त माहिती समोर आली नव्हती. मात्र शोमध्ये तो खुलासे करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राकेश बापट ‘बहू हमारी रजनीकांत’ रिद्धीमा पंडीतसोबत दिसला होता. रिद्धीमा देखील बिग बॉसमध्ये दिसणार आहे.