स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे.
सतत भांडणाऱ्या अप्पू आणि शशांकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अप्पू आणि शशांकच्या या निर्णयानंतर संपूर्ण कानेटकर फॅमिलीला धक्का बसला असून सगळेच अपूर्वा शशांकचा घटस्फोट थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
असं असताना आता मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच मालिकेत अभिनेत्री वीणा जगतापची एंट्री झाली होती. माई आणि दादांची मुलगी अवंतिकाची भूमिका वीणानं साकारली होती.
आता मालिकेत येणाऱ्या नव्या पात्राचं नाव दमयंती दुधखुळे असं असून ती विवाह सल्लागाराची भूमिका साकारणार आहे.
दमयंती दुधखुळे अप्पू आणि शशांक यांच्यात आलेला दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे.
'मालिकेच्या नावाप्रमाणेच या मालिकेत मी एक छोटासा ठिपका असेन जो शशांक आणि अपूर्वाच्या नात्यात प्रेमाचे रंग भरण्याचा प्रयत्न करणार आहे', असं विशाखा सुभेदार भूमिकेविशयी बोलताना म्हणली.
दमयंती दुधखुळे नावावरुनच ही व्यक्तिरेखा विनोदी असेल याचा अंदाज येत आहे.
अप्पू-शशांकला एकत्र आणण्याच्या प्रयत्नात ती तिच्या आयुष्यातील गुंताही सोडवताना दिसणार आहे.