अभिनेत्री आणि आता यूट्यूबर म्हणून आपली नवी ओळख बनवणारी सगळ्यांची लाडकी युट्युबर म्हणजे उर्मिला निंबाळकर. आपल्या सहज सुंदर बोलण्याच्या आणि सांगण्याच्या शैलीनं उर्मिलानं सगळ्यांची मनं जिंकली.
उर्मिला आज अनेक मुलींसाठी, आयांसाठी इन्स्पिरेशन बनली आहे. तिच्या लहान लहान टिप्स देखील अनेक गोष्टी शिकवून जातात.
उर्मिलाने आजवर अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
'दिया और बाती हम', 'एक तारा' या हिंदी तर 'दुहेरी', 'बन मस्का' या मराठी मालिकांमधून उर्मिलानं तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे.
पण आजकाल उर्मिला अभिनयक्षेत्रात फारशी दिसत नाही. त्याचं कारण अखेर तिने सांगितलं आहे.
नुकतंच थिंक बँक' या युट्युब चॅनलला उर्मिलानं एक मुलाखत दिली. यात तिने सांगितलं, 'मी मालिकांमध्ये दिवसाचे 13 तास कमीतकमी तर 17 ते 18 तास सलग शूटिंग करायचे. हे सगळ्याच मालिकांच्या बाबतीत घडतं असं माझ्या लक्षात आलं.'
ती पुढे म्हणाली, 'या जीवशैलीचा माझ्या आरोग्यावर वाईट परिणाम व्हायला सुरुवात झाली. आजारी पडलं तरी गोळ्या खाऊन, सलाईन लावून काम करायला लागायचं.'
'मला भरपूर काम मिळत होतं पण मला ते करायचं नव्हतं. अशा पद्धतीने काम करून आयुष्यच नसणं हे मला मान्य नव्हतं.'
'मी ते काम करून अजिबात खुश नव्हते, मी सेटवर जाऊन फक्त रडायचे. आईबाबांना कायम मला दवाखान्यात भेटायला यायला लागायचं. त्यामुळे मी थांबले.' असा खुलासा उर्मिलाने केला आहे.
आज उर्मिला प्रसिद्ध युट्युबर आहे. मुख्य म्हणजे स्वत:चा स्टुडिओ बनवणारी मराठीतील पहिलीच युट्यूबर ठरली आहे. ती आई देखील झाली असून आता उत्तम आणि आनंदी आयुष्य जगत आहे.