मणिपूरमध्ये 4 मे रोजी दोन महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एका समुदायातील काही पुरुषांनी दुसऱ्या समुदायातील दोन स्त्रियांची नग्नावस्थेत धिंड काढल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेचा सिने -कलाकारांनी जाहीर निषेध करत त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
"मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ पाहून मी हादरलो आहे. मला आशा आहे की दोषींना इतकी कठोर शिक्षा मिळेल की, जेणेकरून भविष्यात कोणीही पुन्हा असं भयानक कृत्य करण्याचा विचार करणार नाही," असं ट्विट बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं केलं आहे.
"मणिपूरमधील दोन महिलांच्या लैंगिक अत्याचाराचा भयानक व्हिडिओ निषेधार्ह आणि अत्यंत अमानवीय आहे. मुख्यमंत्री @NBirenSingh जी यांच्याशी मी बोलले आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे," असं ट्विट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे.
त्याचप्रमाणे अभिनेत्री आणि शिवसेना नेता उर्मिला मातोंडकरनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केलाय. "मणिपूरचा व्हिडीओ आणि या भयानक वास्तवानं मी शॉक्ड झालीये. प्रचंड घाबरले आहे. व्हिडीओ मे महिन्यातील आहे आणि यावर अद्याप कारवाई झालेली नाही. लाज वाटली पाहिजे त्यांना सत्तेची नशा चढली आहे".
अभिनेत्री रेणूका शहाणे यांनीही संपात व्यक्त केलाय. "मणिपूरमध्ये अत्याचार थांबवणारं कोणी नाहीये का? त्या दोन महिलांचा व्हिडीओ पाहून तुम्हाला आतून त्रास झाला नाही, तुम्ही आतून विचलीत झाला नाहीत तर तुम्हाला स्वत:ला माणूस म्हणणं योग्य वाटतं का? भारतीय किंवा इंडियन म्हणणं तर सोडून द्या", अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
"मणिपूरमध्ये जे सुरू आहे ते फार लज्जास्पद आहे. केवळ मणिपूरमध्ये नागी तर संपूर्ण देशासाठी हे लज्जास्पद आहे. 60 दिवस झाले तरी कोणाला अटक केलेली नाही", अशी प्रतिक्रिया अभिनेत्री मॉडेल उर्फी जावेद हिनं दिली आहे.