'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील अभ्या आणि लतीका या दोघांमधील बॉण्डिंग आणि केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला आवडते. या दोघांना ऑनस्क्रीन पाहायला तर प्रेक्षकांना आवडतंच पण या दोघांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री पण छान आहे.
प्रेक्षकांचे लाडके अभ्या आणि लति म्हणजेच समीर परांजपे आणि अक्षया नाईक एकमेकांचे चांगले मित्र आहेत. या दोघांचे मजेशीर रिल्स प्रेक्षकांना पाहायला मिळतात. या दोघांच्या व्हिडीओना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.
आज अभ्या म्हणजेच अभिनेता समीर परांजपेंचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अक्षयाने मालिकेच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेआहेत. त्यासोबतच लतिका म्हणजेच अक्षया नाईकने त्याला हटके कॅप्शन देत शुभेच्छा दिल्या आहेत.
समीर आणि अक्षयाचे फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “माझी सर्वात लाडकी नावडती व्यक्ती…तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला तुझ्या तोंडावर तुला महत्त्व द्यायला आवडत नाही. पण माझ्यासाठी तू खूप महत्त्वाचा आहेस.''
तिने पुढे म्हटलंय कि, '' तू जितका माझा अपमान करतोस तितका मी तर कोणालाही करू देत नाही. ते कौशल्य तुझ्याइतकं दुसऱ्या कोणातही नाही. ''
''मी माझा ग्लास आणि माझा हिरो विसरणार नाही. वाढदिवसाचं गिफ्ट पोहोचलं आहे, पार्टीची वसुली लवकरच करेन.'' अशा शब्दात अक्षयाने समीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षयाच्या या हटके शुभेच्छांना समीरनेही भन्नाट शब्दात कमेंट करत धन्यवाद दिले आहेत. त्याने तिच्या या पोस्टवर ''लय गोड लिहिलं आहेस टुडे'' असं म्हटलं आहे.
तिच्या या पोस्टवर अभ्या आणि लतीच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत समीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी त्यांच्या ऑफस्क्रीन बॉण्डिंगचंही भरपूर कौतुक केलं आहे. अक्षयाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.