रवींद्र महाजनी हे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखणे अभिनेते म्हणून ओळखले जातात, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचे असंख्य चाहते आहेत.
रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबात पत्नी माधवी, मुलगा गश्मीर व मुलगी रश्मी असे चौघे आहेत. रवींद्र महाजनी यांचा लेक गश्मीर तर प्रसिद्ध अभिनेता आहे पण त्यांच्या मुलीविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांची मुलगी रश्मी झगमगाटापासून दूर आहे.
रवींद्र महाजनी यांची मुलगी आणि गश्मीरची बहीण रश्मी विवाहीत आहे. ती गश्मीरपेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे. तीन वर्षांपूर्वी रक्षा बंधनाच्या दिवशी गश्मीरने बहिणीसाठी केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
गश्मीरने बहिणीसाठी लिहिलं होतं की, ''माझी बहीण, माझ्याहून १३ वर्षांनी मोठी. माझी छोटी आईच ती! K.G. पासून ते पाचवी पर्यंत – माझा डब्बा भरणे, मला शाळेसाठी तयार करणे, मला तिच्या कायनेटिक होंडा वरुन शाळेत सोडणे – तिनेच केले.''
''हिरो होण्याकरता मला सिनेसृष्टीत येण्याची गरज नव्हती. जन्मापासूनच मी तिचा स्टार होतो. माझ्या चित्रपटांना यश मिळो वा न मिळो, माझी एक फॅन निश्चितच माझ्या पाठीशी कायम उभी असेल कारण तिचं प्रेम आणि तिची निष्ठा परिस्थितीनुसार बदलत नाही. म्हणूनच नैराश्य माझ्या आसपासही भटकत नाही.''
'' स्वामी म्हणतात “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” .. अर्थात, ते कुणाच्या रुपाने माझ्या पाठीशी उभे आहेत हे तुम्हाला समजलेच असेल,” अशा भावना त्याने बहिणीविषयी व्यक्त केल्या होत्या.
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर गश्मीरची ही पोस्ट चर्चेत आहे.
दरम्यान, गश्मीरचेही लग्न झाले आहे. त्याच्या पत्नीचे नाव गौरी देशमुख आहे, त्यांना एक मुलगाही आहे. गश्मीर पत्नी, मुलगा व आईबरोबर मुंबईत राहतो, तर रवींद्र महाजनी गेल्या आठ महिन्यांपासून आंबी गावात राहत होते.