रविवार 20 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता आाणि सायंकाळी 6 वाजता झी टॉकीज वाहिनीवर टाइमपास 3 हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे ही नवी जोडी या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला आली. रवी जाधव यांनी दगडूला वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आणल्याने या सिनेमाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला होता.
यानिमित्ताने बोलताना रवी जाधव म्हणाले, 'टाइमपास 1 आणि टाइमपास 3 या सिनेमांतील दगडू आणि टाइमपास ३ या सिनेमातील दगडू यामध्ये जो बदल आहे तो त्याच्या आयुष्यात आलेल्या मुलीमुळे झाला आहे'.
'माणसाचं आयुष्य हे त्याची परिस्थिती घडवत असते. पण तीच परिस्थिती त्याला केवळ टाइमपास नव्हे तर आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीही देत असते हा संदेश हलक्याफुलक्या आणि मजेशीर गोष्टीतून देण्याचा प्रयत्न टाइमपास ३ या सिनेमातून केला आहे'.
रवी जाधव पुढे म्हणाले, 'टाइमपास सिनेमातील तिन्हीही भागांमध्ये भेटणारा दगडू खरंतर माझंच प्रतिबिंब आहे. मीदेखील कधी काळी वर्तमानपत्राची लाइन टाकली आहे'.
'शाळा कॉलेजमध्ये अशाच टपल्या मारल्या आहेत. मुलीच्या मागे लागण्याचा अनुभव घेतला आहे. यावर सिनेमा बनवावा हा विचार डोक्यात आला आणि टाइमपास या सिनेमाची तीन पुष्पं गुंफली गेली', असं रवी जाधव म्हणाले.
रवी जाधव आणि दगडू शांताराम परब यांच्या आयुष्यातील खूप गोष्टी एकसारख्या असल्यामुळेच टाइमपास ३ बनवण्याचा विचार रवी जाधव यांच्या मनात आला.
'मीसुध्दा आयुष्यात दगडू परबचं आयुष्य जगलो आहे आणि या सिनेमात दिसणाऱ्या दगडूची गोष्ट म्हणजे माझीच गोष्ट आहे', असं म्हणत रवी जाधव यांनी टाइमपास ३ या सिनेमाशी असलेलं कनेक्शन सांगितलं.