झी मराठीवर 'मन उडू उडू झालं' अल्पावधीतच लोकप्रिय झाली. दिपू आणि इंद्राची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. अभिनेता अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती.
या मालिकेत इंद्रा आणि त्याची हटके स्टाईल तर खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेत अजिंक्य घराघरात पोहचला होता.
या मालिकेनंतर अजिंक्य मोठ्या पडद्यावर झळकला होता. टकाटक, सरी यांसारख्या त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
मोठा पडदा गाजवल्यानंतर इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत आता पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
नुकताच त्याच्या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.
अजिंक्यच्या या नव्या मालिकेचं नाव ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ असं असून 'दोघांच्या मनात बहरलीय प्रीत, दोघांच्या प्रीतीची अजब रीत!' असं म्हणत त्याने प्रोमो शेअर केला आहे.
ही मालिका एक सुंदर लव्हस्टोरी असल्याचं दिसतंय. ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका 17 जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे.
यात अजिंक्य पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याला आता पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.