अभिनेता अभिजीत खांडकेकर आज त्याचा 36 वाढदिवस साजरा करत आहे. अभिजीत खांडकेकरचे जर तुम्ही चाहते असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की अभिनय क्षेत्रात येण्याआधी तो रेडिओ जॉकी म्हणून काम करत होता.
अभिजीतचा जन्म 7 जुलै 1986 साली नाशिकमध्ये झाला. 2009-10 मध्ये आलेल्या महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिअलिटी शोमधून अभिजीत खांडकेकर हा अभिनेता महाराष्ट्राला आणि मराठी कलाक्षेत्राला मिळाला.
त्यानंतर 2010-11मध्ये त्याने झी मराठीवरील माझीया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून पदार्पण केलं. यानंतर तब्बल 4 वर्षांच्या गॅपने त्याने माझ्या नवऱ्याची बायको या सुपरडुपर हिट मालिकेतून पुन्हा कमबॅक केलं. 2016-2021 अशी जवळपास 5 वर्ष ही मालिका सुरू होती. मालिकेतील त्याची गुरूनाथ ही भूमिका चांगलीच प्रसिद्ध झाली.
2021मध्ये तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून अभिजीतला पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाली. ही मालिका आता सुरू असून त्याच्या मल्हार कामत या भूमिकेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
टेलिव्हिजनचा हँडसम हंक म्हणून तरूणांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिजीतनं काही सिनेमातही काम केलंय. 2013मध्ये त्याने जय महाराष्ट्रा ढाबा भटिंडा या सिनेमातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेतली.
त्याचप्रमाणे, 'मामाच्या गावाला जाऊया', 'ढोल ताशे', 'ध्यानीमनी', 'भय', 'बाबा', 'मी पण सचिन', 'इडियट बॉक्स' सारख्या सिनेमात काम केलं. पण त्याचे हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फार काही कमाई करू शकले नाहीत.
2022मध्ये आलेल्या 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे ' या सिनेमात अभिजीतनं राजकीय नेते असलेल्या दादा भुसे यांची भूमिका साकारली होती. या सिनेमातील अभिजीतची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
मालिका, सिनेमा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिजीतच्या सोप्पं नसतं काही आणि दुरंग अशा दोन वेब सीरिज रिलीज झाल्यात.
गेली दहा वर्ष कलाक्षेत्रात काम करणाऱ्या अभिजीतचं एकूण संपत्ती किती असेल असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? तर toptrendnow.comच्या माहितीनुसार, अभिजीत 4-8 कोटींचा मालक आहे.