नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
चित्रपटातील नामवंत चेहऱ्यांमध्ये एक चेहरा झळकला आहे तो आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा, म्हणजेच क्षिती जोगचा.
या चित्रपटात तिची लक्षवेधी व्यक्तिरेखा असून तिने ती उत्तमरित्या साकारली आहे. तिच्या या उत्तम अभिनयामुळेच अनेक कलाकारांनी, चाहत्यांनी क्षितीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
एका बिग बजेट चित्रपटात, इतक्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर, कलाकारांसोबत काम करून क्षितीने तिच्या चाहत्यांना एक सुखद अनुभव दिला आहे.
"यापूर्वीही मी हिंदीमध्ये काम केले आहे आणि ते काम मी एन्जॉयही केले आहे. मात्र या चित्रपटात काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी विलक्षण आहे", असं क्षिती म्हणाली.
"माझ्या व्यक्तिरेखेची इतकी दखल घेतली जात आहे, हे माझ्यासाठी खूप सुखावणारे आहे. मला या चित्रपटात दोन वेगळ्या पिढीतील सुपरस्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली".
"आपण केलेल्या कामाचे दिग्गजांकडून, चाहत्यांकडून कौतुक होणे, हे एका कलाकारासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही मौल्यवान असते. एका कलाकाराला आणखी काय हवे असते".
"या सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली. खूप शिकता आले. एकंदरच हा अनुभव माझ्यासाठी कमाल होता", असंही क्षिती म्हणाली.
तर क्षितीचं तिच्या नवऱ्याने म्हणजे अभिनेता हेमंत ढोमे यानं देखील कौतुक केलं आहे. "इतक्या भव्य दिव्य सिनेमात, एवढ्या मोठ्या नटांमधे, त्या सगळ्या झगमाटात तू लख्खं चमकत होतीस", असं म्हणत त्यानं क्षितीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.