भारत उद्या आपला 75 वा म्हणजेच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. प्रत्येक भारतीयांसाठी ही एक गर्वाची अभिमानाची बाब आहे. बॉलिवूडपासून ते अगदी मराठी इंडस्ट्रीपर्यंत प्रत्येक इंडस्ट्रीने भारत देशाचं सुंदर वर्णन करणाऱ्या अनेक कलाकृती आजपर्यंत तयार केल्या आहेत.
ए आर रहमान यांचा गाजलेला ‘वंदे मातरम’ हा अल्बम सुद्धा भारत देशाचं अप्रतिम वर्णन करणारा अल्बम आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनाला भिडणारी गाणी यामध्ये आहेत. पण हा अल्बम नेमका तयार कसा झाला? त्याच्यामागे दडलेली रंजक गोष्ट माहित आहे का?
तर तो काळ होता 1990 च्या दशकातला. साधारण या दशकामध्ये भारताची आर्थिक व्यवस्था नवे मार्ग उघडू पाहत होती. त्या काळात जाहिरातींना जबरदस्त मागणी होती. आणि जाहिरात क्षेत्रात भारत बाला यांचं मोठं नाव झालं होतं.
पण त्यांचे वडील जे एक स्वातंत्र्यसेनानी होते ते मात्र बरेच दुःखी होते. त्यांची इच्छा होती की आपल्या मुलाने भारतासाठी काहीतरी करावं. भारत बाला यांनी आपला मित्र ए आर रहमानला ‘काहीतरी करूया’ असं सांगितलं आणि एका मोठ्या प्रवासाला सुरुवात झाली.
असं गाणं त्यांना बनवायचं नव्हतं जे तरुणाई ऐकेल पण त्याचा ताल धरून कधीच गाणार नाही. त्यापेक्षा तरुणाईच्या मनात शिरून एक youth anthem बनवावं अशी सगळ्यांची इच्छा होती. आणि अशातच गीतकार मेहबूब यांच्या लेखणीतून ‘माँ तुझे सलाम’ गाणं अवतरलं. एका NRI च्या नजरेतून त्यांनी ‘यहाँ वहा सारा जहाँ देख लिया’ गाणं लिहिलं. सौजन्य- भारत बाला इन्स्टाग्राम
भारत बाला यांना या अल्बमला न्याय द्यायचा होता. त्यांच्या पत्नी कनिका अशा दोघांनी मिळून सर्व पैसे पणाला लावत संपूर्ण भारतात शूटिंग करायचं ठरवलं.सौजन्य- भारत बाला प्रॉडक्शन
त्यांचं लक्ष्य होतं एक मिनिटाच्या 300 छोट्या छोट्या फिल्म्स बनवणं, ते साध्य करत संपूर्ण भारतात याचं शूटिंग करण्यात आलं. सौजन्य- सोनी म्युजिक इंडिया
रहमान यांनी थेट नुसरत फतेह अली खान यांच्याशी संपर्क साधला आणि एका रात्रीत अल्बममधील gurus of peace नावाचं गाणं तयार झालं. तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या वंदे मातरम या ओळींना गिटार आणि इतर वाद्यांच्या साथीने आणखी सुमधुर करायचं काम रहमान यांनी केलं.
असं करत अल्बम तयार तर झाला पण त्याला बाजारात आणण्यासाठी एका खंबीर पाठिंब्याची गरज होती. आणि तो पाठिंबा सोनी म्युजिक इंडियाने दाखवला.
हा अल्बम 1997 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवस आधी बाजरात आणण्यात आला. ते वर्ष होतं स्वातंत्र्यदिनाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्या वर्षी अल्बमने तुफान कमाई केली. अल्बमच्या जवळपास 5 लाख कॅसेट एका आठवड्यात विकल्या गेल्या. आणि या अल्बमने विक्रमी कामगिरी केली. नव्या भारताची ही नवी धून सर्व भारतीयांना भुरळ पाडत होती. सौजन्य- सोनी म्युजिक इंडिया