दिग्दर्शक ओम राऊत यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. त्याचा टीझर रिलीज झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला.
या चित्रपटातील श्रीराम, सीता यांच्यासोबतच हनुमान आणि रावणाच्या भूमिकांवर टीका झाली. या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत असतानाच निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीजची तारीख पुढे ढकलली.
आता आज श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर आदिपुरुष या चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यासोबतच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याविषयीची घोषणा देखील निर्मात्यांनी केली आहे.
चित्रपटाच्या पोस्टरवर रामाच्या रुपात प्रभास, सीतेच्या रुपात क्रिती सेनन, लक्ष्मणाच्या रुपात सनी सिंग आणि रामभक्त हनुमानाच्या रुपात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे झळकत आहे.
'मंत्रों से बढ़के तेरा नाम.... जय श्री राम' असं कॅप्शन लिहित प्रभासनं हे पोस्टर शेअर केलं.
आदिपुरुषच्या या नव्या पोस्टरवर देखील टीका होताना दिसत आहे.
नेटकऱ्यांना लक्ष्मणाच्या शरीरावर चामड्याचं वस्त्र, श्रीरामांच्या शरीरावरही तशाच पद्धतीचं कवच, VFX चा अती वापर हे भावलेलं नाही.
त्यामुळे प्रेक्षक आता आदिपुरुषला कसा प्रतिसाद देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.