नांदेडमध्ये कॉपीमुक्त अभियानाला हारताळ
नांदेड, 22 फेब्रुवारी : सध्या राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र नांदेड जिल्ह्यात वेगळंच चित्र पहायला मिळत आहे. नांदेडमधील एका परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्या जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील चिखली येथील परीक्षा केंद्राचा हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. इंग्रजी पेपरला कॉपी? 12 वीच्या विद्यार्थांना खिडकीतून आणि वर्गात येऊन काॅपी पुरवली जात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. काल इंग्रजी विषयाचा पेपर होता, या पेपरदरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, या व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांना पर्वेक्षकासमोरच कॉपी पुरवली जात असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त आणि बैठे पथक असतानाही कॉपी सुरू असल्याचं दिसत आहे.
व्हिडीओ व्हायरल हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. परीक्षा केंद्रात सर्रासपणे कॉपी सुरू असल्याचं या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.