नांदेड, 1 जून : महाराष्ट्र पोलीस दलातील पदोन्नती (Promotion in Police Department) हा नेहमी वादाचाच विषय राहिला आहे. पदोन्नती रखडल्याचे तुम्ही वाचले असेल. पदोन्नतीसाठी पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयाचीही पायरी चढावी लागते. मात्र, यावेळी एक वेगळीच बातमी समोर आली आहे. पदोन्नतीचा आनंद हा काही पोलीस अधिकाऱ्यासांठी औटघटकेचा ठरला आहे. राज्यातील काही पोलीस निरीक्षक (Police Inspector) पदावरील अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन पोलीस उपअधीक्षक (DSP) बनवले गेले. मात्र, त्यांना मिळालेली ही पदोन्नती औटघटकेची म्हणजे फक्त एका दिवसाची ठरली. कारण सायंकाळी हे पोलीस उपअधीक्षक पदावरुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. हे अधिकारी झाले सेवानिवृत्त - मिलिद गायकवाड, कृष्णदेव पाटील, बंडू कोंडूभैरी, आनंदा होगडे, अनिल बोरसे, सुरेश सोनावणे, श्रीमंत शिंदे, इंद्रजीत राऊत, संजय साळुंखे हे अधिकारी पदोन्नतीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर काही तासांतच सेवानिवृत्त झाले. राज्यातील 415 पोलीस निरीक्षक पोलीस उपअधीक्षक पदासाठी पात्र असल्याची ग्रेडेशन लिस्ट 24 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आली. मात्र, तरीसुद्धा त्यांची पदोन्नती झाली नाही. पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून बढतीची अपेक्षा आहे. सध्या राज्यात पोलीस उपअधीक्षक पदाच्या 192 जागा खाली आहेत. मात्र, तरीसुद्धा वेळेत पदोन्नतीचे आदेश काढले जात नाहीत, अशी ओरड आहे. याच परिस्थितीत शासनाकडून 27 मे रोजी 18 पोलीस निरीक्षकांची यादी मागवून त्यांना पदोन्नती देण्यात आली. यानंतर मंगळवारी 31 मे रोजी या पदोन्नतीचे आदेशही देण्यात आले. मात्र, त्यांचा हा पदोन्नतीचा आनंद औटघटकेचा ठरला. सकाळी बढती मिळाली आणि त्यातले काही अधिकारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. हेही वाचा - 12वी पाससाठी सुवर्णसंधी! राज्यातील पोलीस दलात ‘या’ पदाच्या 136 जागांसाठी भरती; इथे पाठवा अर्ज आणखी पोलीस निरीक्षक होणार निवृत्त सर्जेराव पाटील, सुधीर खैरनार, रामेश्वर रोडगे, भाऊसाहेब अहेर, मुल्ला अजीमोद्दीन, मुकुंद देशमुख हे पोलीस निरीक्षक आधीच सेवानिवत्त झाले. तर आणखी काही पोलीस निरीक्षक हे सेवानिवृत्त होणार आहेत.