फाईल फोटो
नागपूर, 26 फेब्रुवारी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. यावेळी खैरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेत खळबळजनक दावा केला. गडकरी यांची भाजपमध्ये घुसमट होत आहे. भविष्यात त्यांना आणखी बाजुला सारण्यात येईल, अशा त्यांच्या गटात अफवा आहेत, असे वक्तव्य खैरे यांनी केले. ते शिवगर्जना मोहिमेअंतर्गत ते नागपुरला आले होते. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. काय म्हणाले चंद्रकांत खैरै - गडकरी हे उद्धव ठाकरे यांना भेटत असतात आणि फोनवरदेखील ते बोलत असतात. ते भाजपमधील चांगले नेते आहेत. महाराष्ट्रातील खासदारांची कामे करणारे ते एकमेव मंत्री होते. मात्र, त्यांना काम करू दिले जात नाही. त्यामुळे मराठवाड्यातील 17 हजार 500 कोटींची कामे त्यांना करू दिली गेली नाही आणि त्यातून मराठवाड्याचे नुकसान झाले,असा आरोपही त्यांनी केला. तसेच संघ परिवार असल्याने गडकरी यांना पूर्णत: बाजूला करण्यात आलेले नाही, असेही खैरे यावेळी म्हणाले. मराठी माणसाने शिवसेना फोडली… उद्धव ठाकरे आजारी असताना गैरफायदा घेत भाजपने आपली चूल पेटविली. घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे यांनीदेखील शिवसेनेला धोका दिला. ते आनंद दिघे यांचे नाव घेतात, मात्र दिघेंनी असे कधीच केले नव्हते. भाजपने राज्यात नीच राजकारण केले आहे. ईडी, नोटीसा व त्रास देऊन भाजपने आमच्यातील काही गद्दारांना वेगळे केले. ज्या पद्धतीने शिवसेना फोडली ते कोणत्याही शिवसैनिक व जनतेला आवडलेले नाही. शिवसेनेची क्रेझ आजदेखील कायम आहे. मात्र, मराठी माणसाने शिवसेना फोडल्याचे दु:ख आहे, अशी भावना खैरे यांनी यावेळी व्यक्त केली. तिकडे राहुल गांधींचं सावकरांवर वक्तव्य, इकडे फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा; म्हणाले.. भाजपकडून भीमशक्ती व शिवशक्तीत भांडणे लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही घाबरणार नाही. भाजप कोणत्याही थराला जाऊन राजकारण करण्यास मागेपुढे पाहत नाही, असा आरोपही खैरे यांनी यावेळी केला. तर मुस्लिम समाज आणि वंचित आघाडीही शिवसेनेकडे वळायला लागले आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.