मुंबई, 03 मे : कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतो आहे, मात्र बरं होण्याचं प्रमाणही जास्त आहे, हे दिलासादायक आहे. पण संसर्गाची तीव्रता वाढत आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही समस्या उद्भवतात, कोरोनाची काही लक्षणंही दिसतात. त्यामुळे संसर्गातून बरं झाल्यावर केवळ टेस्ट निगेटिव्ह येणं पुरेसं नाही, तर अन्य काही टेस्ट करून घेण्याची शिफारसही केली जाते. आपल्या शरीराची प्रतिकारयंत्रणा (Immune System) विषाणूशी लढते पण कोरोना विषाणूचा प्रभाव शरीरावर दीर्घ काळ राहत असल्याचं आढळलं आहे. शरीरातल्या अनेक महत्त्वाच्या अवयवांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रतिकार यंत्रणेत आणि रक्तात अनेक असे मार्कर्स असतात, की ज्यावरून विषाणूचा शरीरावर झालेला दुष्परिणाम किती आहे, याची माहिती मिळते. गंभीर संसर्ग होऊन गेला असेल, तर विविध चाचण्यांमधून शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांची कोरोनानंतरची स्थिती कळू शकते. igG अँटीबॉडी टेस्ट : संसर्गाशी लढल्यावर शरीर उपयुक्त अँटीबॉडीज (Antibodies) तयार करतं आणि त्यातून भविष्यातल्या संसर्गाचा धोका टळतो. या अँटीबॉडीज किती प्रमाणात आहेत, हे जाणून घेतलं तर तुमची प्रतिकारशक्ती किती आहे, हे कळेलच. शिवाय तुम्ही प्लाझ्मा दानासाठी पात्र आहात की नाही, हेही कळेल. कम्प्लीट ब्लड काउंट टेस्ट (CBC) : सीबीसी टेस्ट या मूलभूत रक्त तपासण्या आहेत. त्यात लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स अशा विविध प्रकारच्या रक्तपेशींचं प्रमाण पाहिलं जातं. कोविड संसर्गाला शरीराने कसा प्रतिसाद दिला हे यातून कळतं. बरं झाल्यानंतर कोणत्या अधिक उपाययोजना कराव्या लागू शकतात, याचा अंदाचही लावता येतो. ग्लुकोज, कोलेस्टेरॉल टेस्ट्स (Glucose, Cholesterol Tests) : विषाणूमुळे दाह आणि रक्तात गुठळ्याही होऊ शकतात. त्यामुळे ब्लड ग्लुकोज किंवा ब्लड प्रेशर अशा शरीराच्या आरोग्याच्या काही मुख्य निदर्शकांमध्ये चढउतार होऊ शकतात. त्यामुळेच कोविड पेशंटना त्यांच्या या महत्त्वाच्या निदर्शकांच्या चाचण्या करायला सांगितल्या जातात. हे वाचा - कोरोना रुग्णांवर आता आयुर्वेदिक औषधाने उपचार; AYUSH 64 घेण्याचा सरकारचा सल्ला टाइप वन, टाइप टू डायबेटीस, कोलेस्टेरॉल किंवा हृदयविकार होण्यासारख्या स्थितीत तुम्ही असाल, तर कोरोना होऊन गेल्यानंतर नियमितपणे या चाचण्या कराव्यात. अनेक कोविड रुग्णांमध्ये साखरेची पातळी प्रचंड वाढली आहे किंवा कमीही झाली आहे. त्यामुळे अशा स्थितीत औषधं बदलावी लागू शकतात, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. बायोकेमिस्ट्री, क्रिएटिनीन, लिव्हर आणि किडनी फंक्शन टेस्ट्सही जोखमीच्या रुग्णांना कराव्या लागू शकतात. न्यूरोफंक्शन टेस्ट (Neurofunction Test) : कोरोनातून बरे झाल्यानंतर काही आठवड्यांनी अनेक रुग्णांना न्यूरॉलॉजिकल आणि मानसशास्त्रीय लक्षणं दिसून आली आहेत. अशी उदाहरणं वाढत आहेत. म्हणून कोविडमधून बरं झाल्यानंतर काही आठवड्यांनी मेंदू आणि न्यूरॉलॉजिकल फंक्शन टेस्ट्स करण्याचा सल्ला डॉक्टर्स देत आहेत. थकवा, झटके अशा गोष्टींवरही लक्ष ठेवलं पाहिजे. 40 वर्षांवरच्या महिलांना अशा जोखमी जास्त असल्याचं आढळलं आहे. व्हिटॅमिन डी टेस्ट (Vitamin D Test) : प्रतिकारयंत्रणेला प्रोत्साहन देणारा व्हिटॅमिन डी हा महत्त्वाचा घटक आहे. कोरोनातून बरं होत असताना व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्समुळे अधिक फायदा होत असल्याचंही आढळलं आहे. त्यामुळे व्हिटॅमिन डी टेस्ट महत्त्वाची असून त्यातून त्या व्हिटॅमिनची कमतरता असल्यास कळतं. छातीचा स्कॅन (Chest Scan) : कोरोना संसर्गाची तीव्रता तपासण्यासाठी सध्या HRCT स्कॅन्सचा उपयोग केला जात आहे. कोविड 19 मुळे फुप्फुसांवर किती परिणाम झाला आहे, हे त्यातून कळतं. बहुतांश रुग्णांची फुप्फुसं कोरोनानंतर चांगल्या पद्धतीने काम करू लागतात. तरीही काही जणांना बाहेरून ऑक्सिजन द्यावा लागू शकतो. किती प्रमाणात बरं वाटलं आहे, याचा अंदाज घेण्यासाठी सीटी स्कॅन, लंग फंक्शन टेस्ट्स उपयोगी पडू शकतात. बरं झाल्यावर तीन ते सहा महिने विशेष काळजी घ्यावी लागते. हार्ट इमेजिंग, कार्डियाक स्क्रिनिंग्ज (Heart Imaging, Cardiac Screenings) : कोविड-19 मुळे हृदयाच्या महत्त्वाच्या स्नायूंना दुखापत होऊ शकते. त्यामुळे मायोकार्डायटिस होऊ शकतो, असं अनेक रुग्णांत आढळलं आहे. ज्यांना आधीच हृदयविकाराचा धोका आहे, त्यांना त्याची अधिक भीती आहे. त्यामुळे मध्यम ते तीव्र संसर्ग झालेल्यांनी इमेजिंग स्कॅन्स आणि हार्ट फंक्शन टेस्ट्स करणं चांगलं. हे वाचा - दिलासादायक! Corona संसर्गाच प्रमाण घटलं, तर बरे होणाऱ्यांची संख्या वाढली कोविडमध्ये ज्यांना छातीत दुखतं आहे, त्यांनीही डॉक्टरांशी चर्चा करून अशा टेस्ट्स करणं गरजेचं असल्याचं डॉक्टर्स सांगतात.