23 फेब्रुवारी : पुण्यामध्ये भाजपची चांगलीच सरशी झालीय. भाजप नंबर वनचा पक्ष ठरलाय तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीचा, अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात भाजपनं जोरदार मुसंडी मारलीय.
खरंतर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा गड असलेल्या पुण्यात भाजपला इतकं यश मिळेल असं कुणालाच वाटलं नव्हतं पण केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत भाजपचे महत्त्वाचे नेते प्रचारात सहभागी झाले होते. त्यात पालकमंत्री गिरीष बापट यांची रणनीती, त्यांना संजय काकडे यांची मिळालेली अर्थपूर्ण साथ यामुळेच भाजपला पुण्यात एकहाती सत्ता मिळालीय.
गेली 15 वर्षं पुणे महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आहेत. पण मेट्रोपासून ते विकास आराखड्यापर्यंत अनेक प्रश्न प्रलंबितच राहिले.त्यामुळे त्याचा फटकाही राष्ट्रवादीला बसला. राष्ट्रवादीची 10 वर्षं सत्ता असूनही पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आणि विकास आराखडाही रखडला. हे सगळं पाहता पुणेकरांनी भाजपच्या पारड्यात आपलं मत टाकलं.
पुण्याच्या निवडणुकीत मोदी फॅक्टर महत्त्वाचा ठरला. भाजपच्या पारंपरिक मतदारांचं चांगलं मतदान झालं, त्यासोबतच उच्चभ्रू मतदारही मतदानासाठी बाहेर पडला. या कारणांमुळेही भाजपची इथे सरशी झाली.
राष्ट्रवादीतली अंतर्गत धुसफूस, सुरेश कलमाडींनंतर नेतृत्वहीन झालेलं काँग्रेस यामुळे मतदार भाजपकडे वळले. नवमतदारांनीही भाजपला पसंती दिली. मुख्यमंत्र्यांची पुण्यातली सभा जरी फसली असली तरी त्याच प्रभागात सगळ्यात जास्त मतदान झालं.
पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांसाठीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. गिरीष बापट यांनी तर या निवडणुकीसाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. एकूणच, पुणेकरांनी पार्लमेंट ते पालिका पूर्णपणे भाजपला पसंती दिल्याचं दिसतंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv