उस्मानाबाद, 24 जुलै : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाचा वणवा पेटलाय. मराठा मोर्चाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. उस्मानाबादमध्ये एका तरूणाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कृष्णा बाबासाहेब गंभीरे असं या तरुणाचं नाव आहे. उस्मानाबाद जिल्हयातील कळंबचा तो रहिवासी आहे. शिर्डीत पायी वारीत असताना मोबाईलवर बातमी पाहिल्यानंतर कृष्णाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात असून तरुणाची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी औंरगाबादच्या काकासाहेब शिंदेंनी काल गोदावरीत उडी मारली आणि आंदोलनादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. मराठा आंदोलनाला काही ठिकाणी हिसंक वळण मिळालं
औरंगाबाद, नांदेडमध्ये बंदला हिंसक वळण मिळालं. सकाळपासूनच मराठा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आणि आंदोलकांनी पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. जमावानं अनेक वाहनाची तोडफोड केली. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी उद्या मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई रायगडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र यामधून शाळा आणि अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आलाय. उद्या बंद नंतर पुढील महिन्यात 9 ऑगस्ट रोजी ठोक आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलीय. याआधी आज नवी मुंबईत सकल मराठा समाजाची बैठक वाशीतील माथाडी भवनात पार पडली. या बैठकीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड येथून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत उद्या नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.