जळगाव, 21 जून : घरामध्ये टीव्हीचा आवाज वाढवला म्हणून दहा वर्षीय भाच्याला मामाने सरोटा तापवून हात आणि पायावर चटके दिल्याची घटना अजिंठा विश्रामगृहातील क्वाॅर्टरमध्ये घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या काकाने दिलेल्या फिर्यादीवरून मुलाच्या मामा विरूद्ध ज्यूवेनाईल जस्टीस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंठा विश्रामगृहाच्या क्वाॅर्टरमध्ये राहणाऱ्या गणेश कन्हैय्यालाल सोनार (वय १०) या मुलाने १८ जून रोजी घरात टीव्हीचा आवाज वाढवला होता. त्याचे आई-वडील दिव्यांग (मूक बधिर) आहेत. टीव्हीचा आवाज वाढवल्याचा राग आल्याने गणेशचा मामा मयूर देवीदास अहिरराव यांने दुपारी २ वाजता घरातील गॅसवर सरोटा तापवून गणेशच्या डाव्या पायावर आणि हातावर चटके दिले. या चटक्यामुळे त्याचा पाय आणि हात भाजला. घटना घडली तेव्हा पीडित मुलाच्या आईने प्रतिकार करत मामाला हे कृत्य करण्यास मज्जाव केला होता. घटना घडली त्यावेळेस मुलाचे बाबा मात्र बाहेर कामासाठी गेलेले होते.
गणेशचे काका गोविंद दत्तात्रय सोनार (वय ३२) हे बुधवारी गणेशच्या घरी गेले, तेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी अंगावरील जखमेसंदर्भात विचारणा केल्यानंतर गणेशने आपबिती सांगितली. या प्रकारानंतर गोविंद सोनार यांनी मयूर अहिररावविरूद्ध गुन्हा दाखल झाला. वाकडी येथे अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असताना शहरातील अजिंठा विश्रामगृहाच्या क्वार्टवरमध्ये ही घटना घडली.
या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या काकाने दिलेल्या फिर्यादीवरून मुलाच्या मामा विरूद्ध बुधवारी रात्री ११.३० वाजता रामानंद पोलिसांत कलम 324 भा.द.वी कलम 23 ज्यूवेनाईल जस्टीस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रोहम यांच्याकडून मिळाली. तपास सुरू असून आरोपी धुळे जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं ही ते म्हणाले.