अहमदाबाद, 17 जुलै : गुजरातमध्ये (Gujrat Heavy Rain) सध्या तुफान पाऊस होत आहे. ज्यामुळे ठिकठिकाणी पाणी जमा झालं आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान अहमदाबादमधून एक हैराण करणारा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. शहरातील वस्त्राल भागात पाहता पाहता रस्ता खचल्याचा हा व्हिडीओ आहे. रस्ता खचल्यानंतर तेथे एक मोठा खड्डा तयार झाला आणि यात पाणी जमा झालं. सुदैवाने आधीच काळजी घेतल्यामुळे अपघात टळला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल… रस्ता खचल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर युजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. गुजरातच्या विकास मॉडेलवर सवाल उपस्थित केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी तापी जिल्ह्यातील खड्ड्येमय रस्त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आतापर्यंत 106 जणांचा मृत्यू… गुजरातमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नवसारी, वलसाड, सूरत, नर्मदा, छोटा उदेयपूर, अहमदाबाद, सौराष्ट्रमधील गीर सोमनाथ, द्वारिका आणि राजकोटमधील अनेक भागांमध्ये अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर पावसामुळे नवसाजी, वलसाड आणि कच्छच्या शाळांना बंद करण्यात आलं आहे. पावसामुळे विविध घटनांमध्ये आतापर्यंत 106 जणांचा मृत्यूही झाला आहे.
राष्ट्रीय महामार्गाचं नुकसान… दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमधील अनेक भागातील बऱ्याच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरांमधील गल्ली आणि रस्तेच नाही तर राष्ट्रीय महामार्गावरही मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे वापी-सिल्वासा राष्ट्रीय महामार्ग 48 पूर्णपणे खड्डेमय झाला आहे.