मुंबई, 10 सप्टेंबर : टेक्नॉलॉजीमध्ये प्रगतीचा वेग जसा वाढतोय, तसा वाहन उद्योग क्षेत्राच्या विकासानेही वेग पकडलाय. आता कार्स अधिक सुरक्षित होताहेत; मात्र तरीही अनेकदा असे काही प्रसंग घडतात, जे मोठ्या अपघाताचं कारण बनतात. यामध्ये एक म्हणजे गाडीचा ब्रेक फेल होणं. सध्याच्या काळात मात्र अशी परिस्थिती उद्भवण्याचं प्रमाण 5 लाखांमध्ये एक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. कारण ऑइल प्रेशर आणि सॉफ्टवेअर ऑपरेशन्समुळे हे प्रमाण खूप कमी झाले; पण तुम्ही त्या 5 लाखांपैकी एक असाल तर? नुसत्या विचारानेच धडकी भरली असेल; पण काळजी करू नका. अशा स्थितीत नेमकं काय करायचं, याची माहिती आपण घेऊ या. कसा होतो गाडीचा ब्रेक फेल? ब्रेक फेल्युअर होण्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत. त्यामधलं एक म्हणजे ब्रेक ऑइल प्रेशर डिस्ट्रीब्युट करणारा पाइप खराब होऊन ब्रेक ऑइल लीक होणं. अशा स्थितीतही ज्या गाड्यांमध्ये रियर ड्रम ब्रेक आहेत, त्या गाड्यांचा ब्रेक काही प्रमाणात लागेल. परंतु ज्या गाड्यांचे चारही डिस्क ब्रेक आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी समस्या ठरू शकते. दुसरं कारण म्हणजे गाड्यांच्या ‘ईसीएम’मध्ये मोठा बिघाड झाल्यास ब्रेक फेल होतो; मात्र अशा परिस्थितीत गाडी बंद पडण्याची शक्यता जास्त असते. हेही वाचा - Car Seat Belt: रियर सीटबेल्ट वापरणं आहे महत्वाचं; सायरस मिस्त्रींच्या वेदनादायक मृत्यूनं जगाला मिळाला धडा ब्रेक फेल झाल्यावर अशी थांबवा गाडी 1. ब्रेक न लागल्यास घाबरू नका आणि सर्वांत प्रथम अॅक्सलरेटरवरून पाय काढा. यानंतर ब्रेक पेडल पंप करा. ब्रेक पेडल पूर्ण खाली जात असेल तर ते सोडा. मॅन्युअल कार थांबवणं थोडं सोपं आहे. यामध्ये तुम्ही एकामागून एक गीअर्स शिफ्ट करून सर्वांत पहिल्या गिअरवर गाडी आणावी. यामुळे तुमच्या कारचा वेग खूप कमी होईल. लक्षात ठेवा की, या काळात तुम्हाला गाडी रस्त्याच्या बाजूने चालवावी लागेल. 2. ऑटोमॅटिक कार थांबवण्यासाठी गीअर शिफ्टचा ऑप्शन नाही आणि कार तिच्या वेगानुसार गीअर शिफ्ट करेल. परंतु ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारमध्ये ब्रेक लागत नसला तरीही ब्रेक पेडल वारंवार पंप करा. कारण त्यामुळे ऑटो गीअर गाड्या हळूहळू गीअर शिफ्ट करतात व गाडीचा वेग कमी होतो. 3. यानंतर गाडी थांबवण्यासाठी आवश्यक स्टेप म्हणजे हँडब्रेक; मात्र अचानक हँडब्रेक ओढल्याने मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळेल. कारण असं केल्याने गाडी उलटण्याची किंवा जागेवर फिरण्याची शक्यता जास्त असते. बहुतेकसे हँडब्रेक वायर ऑपरेटेड असतात, आणि या ब्रेकचा वापर कमी प्रमाणात होत असल्यामुळे प्रत्येक टायरवर ब्रेकिंग डिस्ट्रिब्युशन वेगवेगळं असतं. अशा स्थितीत अतिवेगात गाडी चालवताना हा ब्रेक अचानक ओढणं धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हँडब्रेक हळूहळू ओढणं उपयुक्त ठरेल. 4. हँडब्रेक स्टेप बाय स्टेप खेचा. गाडीच्या हँडब्रेकला पाच ते सहा स्टेप असतात. अशा परिस्थितीत, तो ओढताना एक एक स्टेप कलेक्ट होऊ द्या. यामुळे गाडीचा हळूहळू ब्रेक लागेल आणि जेव्हा गाडीचा वेग प्रति तास 20 किलोमीटरपेक्षा कमी असेल, तेव्हा स्टीअरिंग सरळ केल्यानंतर हँडब्रेक पूर्णपणे ओढा. या पद्धतीचा उपयोग केल्यास ज्या गाडीचा ब्रेक फेल झाला आहे, ती गाडी व्यवस्थित थांबवता येऊ शकते.