नवी दिल्ली, 24 मे : मागच्या काही दिवसांपूर्वी केंद्राकडून गव्हावर निर्यात बंदी घालण्यात आली होती. दरम्यान आता केंद्राकडून साखरेवर निर्यात बंदी (Export ban on sugar) घालण्यात येणार असल्याची शक्यता आहे. ब्लूमबर्ग न्यूज फ्लॅशने याबाबत खात्रीलायक वृत्त दिले आहे. मागच्या 6 वर्षात पहिल्यांदाच साखरेवर निर्यात बंदी येण्याची शक्यता (Export ban on sugar likely for first time in 6 years) आहे. दरम्यान याचा परिणाम येणाऱ्या ऊस हंगामावर (sugar cane farmer) होण्याची शक्यता आहे.
सरकार या हंगामात निर्यात १० दशलक्ष टनांपर्यंत मर्यादित ठेवण्याचीही शक्यता आहे. याबाबत ब्लूमबर्गने यापूर्वी अहवाल दिला होता. रॉयटर्सच्या अहवालातही सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार भारत या हंगामातील साखर निर्यात 10 मेट्रिक टनापर्यंत मर्यादित ठेवण्याची योजना आखत आहे. मागच्या 6 वर्षात पहिल्यांदाच साखरेवर निर्यात बंदी येण्याची शक्यता आहे. देशांतर्गत साखरेच्या किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे ही वाचा : महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, एकत्र लढणार?
जागतिक बाजापेठेत ब्राझीलनंतर दुसरा सर्वात मोठा निर्यातदार भारत आहे. दरम्यान साखरेवर निर्यात बंदी घालणार असल्याचे समजताच काही व्यापाऱ्यांनी वेळीच पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. साखर निर्यातीला आळा घालण्याच्या या नव्या हालचालीला काही जण जागतिक खाद्यपदार्थांच्या किमतींसाठी एक नवीन धोका म्हणून पाहत आहेत.
इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनने साखरेच्या निर्यात मर्यादेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. CNBC-TV18 ला दिलेल्या माहितीनुसार, 2021-22 हंगामात अंदाजे 9.5 MT उत्पादन झाले होते. दरम्यान भारताने 8 मेट्रीक टन साखर निर्यात करण्याचे करार केले आहेत. याचबरोबर विश्लेषकांचे म्हणण्यानुसार, 10 मेट्रीक टनापर्यंत साखर निर्यात झाल्यास मोठी निर्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे साखर कारखानदारांना जास्तीत जास्त साखर निर्यात करण्यास मदत होणार आहे. तसेच देशात साखरेचे भावही नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी देशात साखरेचे उत्पादन ३५.५ मेट्रिक टन झाले होते.
हे ही वाचा : Viral Video: मुलीनं असं काही केलं की संतापला हत्ती, थेट सोंड उचलून केला धक्कादायक प्रकार
इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने 19 मे रोजी दिलेल्या निवेदनानुसार, जागतिक बाजारपेठेत भारतीय साखरेला चांगल्या मागणीमुळे ऑक्टोबर 2021-एप्रिल 2022 या कालावधीत साखर निर्यात 64 टक्क्यांनी वाढून 71 लाख टन झाली. मागच्या वर्षी याच कालावधीत ४३.१९ लाख टन साखर निर्यात झाली होती. भारताकडे आणखी 8 ते 10 लाख टन साखर मे 2022 मध्ये प्रत्यक्ष निर्यातीसाठी तयार आहे.
ISMA ने दिलेल्या माहितीनुसार, चालू 2021-22 वर्षात 90 लाख टनांहून अधिक निर्यात होण्याची अपेक्षा आहे, मागील वर्षी 71.91 लाख टनांची निर्यात झाली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झालेली साखर निर्यात 15 मे पर्यंत साखरेचे उत्पादन 14 टक्क्यांनी वाढून 348.83 लाख टन झाले आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत साखरेचे उत्पादन 304.77 लाख टन होते. दरम्यान साखर निर्यातीचे वर्ष ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 पर्यंत चालते.
18 मे पर्यंत भारताने 75 लाख टन साखरेची निर्यात केल्याचे अन्न मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. चालू साखर हंगाम 2021-22 मध्ये साखरेची निर्यात 2017-18 च्या साखर हंगामातील निर्यातीच्या तुलनेत 15 पट असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
इंडोनेशिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, UAE आणि आफ्रिकन हे देश भारताचे प्रमुख आयातदार देश आहेत. भारतात साखरेची सरासरी किरकोळ किंमत 41.50 रुपये प्रति किलो आहे. तर पुढच्या काळात ती 40-43 रुपये प्रति किलोच्या पटीत राहण्याची शक्यता आहे.