28 जानेवारी : राज्यात कुठेही टोल देऊ नका, तुम्हाला कुणी अडवलं तर त्याला तुडवा असा आदेश देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या राजगड आणि लोणी काळभोर इथं राज ठाकरेंविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
कलम 109, 143, 147 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी वाशी इथं मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज यांच्या हस्ते झालं. यावेळी राज यांनी समस्त मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज्यात कुठेही टोल मागितले तर तुडवून काढा जे होईल ते पाहुन घेऊ असे आदेश राज यांनी दिले होते.
‘राज’आज्ञेनंतर मनसेसैनिकांनी संपूर्ण मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, औरंगाबादमध्ये मनसैनिकांनी टोलनाके फोडून काढले होते. राज ठाकरे यांच्या ‘आदेशा’ची गृहमंत्रालयानं दखल घेतली होती. राज ठाकरेंचं भाषण तपासण्याचे आदेश गृह खात्याने कायदा मंत्रालयाला दिले होते. अखेर आज राजगड आणि लोणी काळभोर इथं राज ठाकरेंविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.