28 जानेवारी : मनसेचा ‘टोल’धाड सुरूच आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज काही ठिकाणी पुन्हा टोलनाके फोडले. मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंकवर मनसेचे नेते कप्तान मलिक यांनी कार्यकर्त्यांसह टोलनाक्याची तोडफोड केली. जालना औरंगाबाद रोडवरच्या नागेवाडी टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
हा सर्व प्रकार सकाळी सहाच्या सुमारास घडला. एकीकडे हिंसक आंदोलन सुरू असताना दहिसरमध्ये मनसेनं टोलनाक्यावर शांततामय आंदोलन केलं. मनसेचं आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. टोल देऊ नका असं लिहिलेले स्टिकर्स वाहनांवर चिकटवण्यात आले.
दरम्यान, नवी मुंबईत प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मनसेच्या 17 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. टोलविरोधी आंदोलनानंतर टोलनाक्यांवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून टोलवसुलीला पुन्हा सुरुवात करण्यात आलीये.