28 जानेवारी : मनसेनं गेल्या दोन दिवसांपासून टोल नाक्यांची तोडफोड केलीय. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी भाजपवर निशाणा साधलाय. या टोल संस्कृतीचा बाप कोण ? असा खडा सवाल आबांनी भाजपला विचारलाय.
तसंच जिथे भाजपशासित प्रदेश तिथे टोल आहे, आज गोपीनाथ मुंडे म्हणतात, सत्ता आल्यावर राज्य टोलमुक्त करू पण युतीचे सरकार असताना मुंडेंनीच नितीन गडकरींना पुढे केले होते याची आठवणही आबांनी करुन दिली. ते पुण्यात बोलत होते.
मनसेच्या टोलफोडीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. नव्या नियमांनुसार टोल आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान संबंधित पक्षाकडून वसूल केलं जाईल असंही आबांनी पुन्हा एकदा सांगितलं. दरम्यान, उद्या कॅबिनेटच्या बैठकीत राज्याचं टोलविषयक धोरण स्पष्ट करणार असल्याचं संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलंय.