09 डिसेंबर : चार राज्यात झालेल्या काँग्रेसच्या पराभवाचा गांभीर्याने विचार करायला हवा. जनतेला, खंबीर आणि प्रभावी उपाययोजना करणार्या राज्यकर्त्यांची गरज आहे, अशी टिपण्णी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी काल जाहीर झालेल्या निवडणुकांच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या प्रसिद्ध केली.
काँग्रेस पक्षाला जो फटका बसला आहे त्याचा गांभीर्याने विचार काँग्रेससह आम्हा सर्वांनाच करावा लागणार आहे. या पराभवात नव्या पिढीचे मोठे योगदान असून या पिढीचा राग मतदानातून व्यक्त झालं आहे. निर्भयावरील बलात्कारासारख्या दुर्दैवी घटनांनी तरुण वर्ग अस्वस्थ झाला आणि मोठ्या प्रमाणावर तो आम आदमीच्या बाजूने गेला असल्याचे त्यानी म्हंटलय. एरवी मतदानाला न उतरणारा उच्चमध्यमवर्गही आम आदमी पार्टीच्या बाजूने यावेळी मतदानात उतरलेला दिसला. पण यापेक्षाही गरीब वर्गाने आम आदमी पार्टीला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं असल्याचं ही ते म्हाणाले. राज्यकर्ता हा खंबीर आणि प्रभावी उपाययोजना करणारा, निर्णयाची खंबीरपणे अंमलबजावणी करणारा असला पाहिजे. जनतेला दुबळे राज्यकर्ते आवडत नाहीत हे त्यांनी या पाच राज्याच्या निवडणुकीतून दाखवून दिले आहे.
‘आप’ने कांदा, भाज्या व वीजेचे दर निम्म्यावर आणून दाखवावेच -पवार
“सध्या दिल्लीत 4-5 महिने राज्यपालांचे शासन असण्याची चिन्हे आहेत, कारण ‘आप’ किंवा भाजप या दोन्ही पक्षांकडे बहुमत नाहीये. पण दिल्लीत आम आदमी पार्टीचं सरकार यावे आणि त्यांनी कांदा, भाज्या आणि वीज यांचे दर निम्म्यावर आणून दाखवावेत असे मला वाटते. तेव्हाच त्यांच्या प्रचारातला फोलपणा देशासमोर येईल कारण या भावांवर राज्यांचे काहीच नियंत्रण नसते. उत्पादनावर आधारित दरांचे चढउतार होत असतात, हे वास्तव आहे”, अशी टीका पवारांनी केली आहे.