नवी दिल्ली, 31 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 73व्या ‘मन की बात’मधून नवीन वर्षात पहिल्यांदा जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. देशासाठी असामान्य काम करणाऱ्या लोकांचा देशाने पद्म पुरस्कारांद्वारे गौरव केला आहे. त्यांची कामगिरी आणि मानवतेप्रती त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपण सर्वांनी माहिती करून घेणं गरजेचं असून अशा लोकांपासून प्रेरणा मिळत असल्याचं ते म्हणाले. या वर्षापासून भारत आपल्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा अमृतमहोत्सव सुरू करत आहे. भारताच्या प्रत्येक भागात, प्रत्येक शहरात, गावात स्वातंत्र्याचा संग्राम संपूर्ण ताकदीनिशी लढला गेला होता. भारताच्या भूमीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अशा महान सुपुत्र आणि वीरांगणांनी जन्म घेतला. ज्यांनी राष्ट्रासाठी आपलं जीवन वाहून टाकलं, अशा महान लोकांचा संघर्ष आणि त्यांच्या आठवणी काळजीपूर्वक जतन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यांच्याबाबतीत लिहून आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी त्यांच्या स्मृति चिरंतन ठेवू शकतो, असंही मोदी म्हणाले. तरूण लेखकांसाठी भारताच्या पंचाहत्तरीनिमित्त एक उपक्रम सुरू केला जात असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.
या उपक्रमाबाबत बोलताना मोदींनी देशातील देशवासियांना, तरुणांना, लेखकांना देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल, स्वातंत्र्यासंबंधी घटनांबद्दल लिहिण्याचं आवाहन केलं आहे. या उपक्रमातून सर्व राज्यातील आणि भाषांमधील युवा लेखकांना प्रोत्साहन मिळेल. देशात अशा विषयांवर लिहिणारे लेखक मोठ्या प्रमाणात तयार होतील, ज्यांचा भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास असेल. या उपक्रमामुळे भविष्याची दिशा निश्चित करणाऱ्या विचारवंत नेत्यांचा एक वर्गही तयार होईल. तरुणांनी या उपक्रमात पुढाकार घेऊन आपल्या साहित्यिक कौशल्याचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा असं मोदी म्हणाले. या संबंधित माहिती शिक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून मिळवता येईल.
आपल्या भागातल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातल्या वीरगाथांबद्दल पुस्तक लिहावं. यंदा भारत आपल्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असताना, आपलं लिखाण स्वातंत्र्य संग्रामातल्या महान लोकांप्रति एक उत्तम श्रद्धांजलि ठरेल, असंही मोदी म्हणाले.