उदय जाधव गांधीनगर, ३० मार्च : शिवसेना - भाजपची युती तुटल्यानंतरच्या भाजप - शिवसेनेमधल्या चकमकी काही फार जुन्या नाहीत. उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अफझलखान या नावाने केलेला उद्धार आणि मग अमित शहांनी त्यांनी दिलेला ‘पटक देंगे’ चा इशारा लोक अजूनही विसरलेले नाहीत. या वादात जसे सगळे खान आले तसंच कुंभकर्णाच्या नावाने रामायण, महाभारतही झालं. पण आता मात्र मोदींच्या गुजरातमध्येच, गांधीनगरमध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहांची दिलजमाई झाली आहे. आमची हृदयं एक झाली आहेत, असा मृदू सूर लावत उद्धव ठाकरेंनी अमित शहांच्या भव्य सभेमध्ये भाग घेतला. एवढंच नव्हे तर अमित शहांनी गांधीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला तेव्हाही उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत होते. ‘मला बघून आश्चर्य वाटलं असेल’ विधानसभा आणि लोकसभेमध्ये पाहिलेल्या या दोन चित्रांवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. उद्धव ठाकरेंच्याही मनात कदाचित हेच चाललं असावं. म्हणूनच अमित शहांच्या सभेमध्ये भाषण करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मला इथे बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण आता आम्ही मनाने एक झालो आहोत.’ अमित शहांनीही उद्धव ठाकरेंचं मनापासून स्वागत केलं. मी त्यांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो, असं अमित शहा News 18 लोकमत शी बोलताना सांगितलं. अर्थात, निवडणुकीच्या राजकारणात ही दिलजमाई झाली असली तरी अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन आपल्याला युतीसाठी गळ घातली हे सांगायला मात्र उद्धव ठाकरे विसरले नाहीत. या सगळ्या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी लगेच ट्वीट करून भाष्य केलं.
अमित शहांच्या सभेमध्ये आणि गांधीनगरमध्येही उद्धव ठाकरेंना व्हीआयपी गेस्टची ट्रीटमेंट देण्यात आली होती. अमित शहा जिथून सभेसाठी गेले त्याच रस्त्याने उद्धव ठाकरेंना नेण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेच्या नेत्यांचा, शिवसैनिकांचा ताफाही नव्हता. त्यांच्यासोबत फक्त मिलिंद नार्वेकर होते. त्यामुळेच अमित शहांसोबत उद्धव ठाकरे पहिल्यांदाच असे एकट्याने गर्दीला सामोरे गेले. गुजरातमध्ये शिवसेनेचा इतका दबदबा नसतानाही भाजप कार्यकर्ते आणि गुजराथी नागरिकांनी उद्धव ठाकरेंना चांगला प्रतिसाद दिला. काही गुजराथी व्यापारी उद्धव ठाकरेंसोबत सेल्फी काढत असतानाही पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंचं सीमोल्लंघन उद्धव ठाकरे हे फारसे महाराष्ट्राबाहेर पडत नाहीत. इतर राज्यांतल्या व्यासपीठावरही ते फारसे दिसत नाहीत. पण या निवडणुकीत मात्र त्यांनी अयोध्येचाही दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही होते. शिवसैनिकांचा मोठा ताफा होता. म्हणूनच यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क आणि मुंबईहून खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन केलं आहे, असंच म्हणावं लागेल. आपल्या अयोध्या दौऱ्यात, ‘आधी मंदिर मग सरकार’असा नारा देत,आम्ही झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला आलो आहोत, असं त्यांनी म्हटलं होतं. आता मात्र अफजलखानाशी पंगा नाही, कुंभकर्णाला उठवणं नाही… तर पूर्णपणे दिलजमाई झाली आहे. असं असलं तरी सत्तेसाठी झालेली ही दिलजमाई पुढेही टिकणार का, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. =============================================================================================================================================== VIDEO: ‘आपला पंतप्रधान कोण?’ उद्धव ठाकरे म्हणाले…