JOIN US
मराठी बातम्या / देश / चित्रपटासारखीच आहे विक्रम साराभाई यांची प्रेमकहाणी; Love Triangle मध्ये पती, पत्नी आणि 'ती'

चित्रपटासारखीच आहे विक्रम साराभाई यांची प्रेमकहाणी; Love Triangle मध्ये पती, पत्नी आणि 'ती'

भारतीय अवकाश विज्ञानाचे जनक अशी ओळख असणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांची प्रेमकहाणी एक-दोन वर्षं नाही तर तब्बल 20 वर्षांची आहे. त्यांचे लग्न एक वादळी प्रेमकथा होतं, तर दुसरी कहाणी परिपक्व प्रेमकथेची होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 फेब्रुवारी: जगातील पाच सर्वात मोठ्या अंतराळ संशोधन संस्थांपैकी एक असेलल्या इस्रो (ISRO) अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा पाया घालणारे शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई (Dr. Vikram Sarabhai) यांना सगळा देश ओळखतो. अंतराळ संशोधन क्षेत्रात आज भारत एक आघाडीचा देश म्हणून ओळखला जातो यात सिंहाचा वाटा डॉ. विक्रम साराभाई यांचा आहे. अत्यंत देखणे, राजबिंडे व्यक्तीमत्त्व लाभलेल्या डॉ. साराभाई यांची कारकीर्द, त्यांचे संशोधन सर्वांनाच माहित आहे. मात्र लव्ह ट्रँगलमुळे (Love Triangle) त्यांच्या खासगी आयुष्यात उद्भवलेल्या समस्येबाबत फार कमी लोकांना माहित आहे. खरंतर, शास्त्रज्ञ म्हणजे गंभीर, संशोधनात बुडालेले लोक असा समज असतो, पण प्रेमाच्या जादूपासून दूर राहणं त्यांनाही शक्य होत नाही. याचेच उदाहरण म्हणजे डॉ. विक्रम साराभाई यांची प्रेमकहाणी. जाणून घेऊ या देशातील प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांची प्रेमकहाणी… भारतीय अवकाश विज्ञानाचे जनक अशी ओळख असणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांची प्रेमकहाणी एक-दोन वर्षं नाही तर तब्बल 20 वर्षांची आहे. त्यांचे लग्न एक वादळी प्रेमकथा होतं, तर दुसरी कहाणी परिपक्व प्रेमकथेची होती. अत्यंत उंचापुरा बांधा, गोरा वर्ण आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचं तेज असे डॉ. विक्रम साराभाई यांचं व्यक्तिमत्त्व कोणालाही सहज प्रभावित करेल असे होते. देशात औद्योगिक क्रांतीचा पाया रचण्यात विशेष भूमिका बजावणाऱ्या देशातील पहिल्या दहा उद्योगपती कुटुंबांपैकी एक अशा साराभाई कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. या कुटुंबाचे गांधी आणि नेहरू यांच्याशी घनिष्ट संबंध होते. हे वाचा- Valentine week: ज्या मुलीच्या घराण्याशी होतं हाडवैर तिच्याशीच केलं गुपचुप लग्न, ‘दादा’ची अनोखी प्रेमकहाणी भौतिकशास्त्र आणि गणितात हुशार असणारे विक्रम साराभाई ऑक्सफर्डला (Oxford) शिकायला गेले होते. तेव्हा अमेरिका (USA) आणि रशिया (Russia) अवकाश शास्त्रात (Space Science) विविध प्रयोग करत होते. सगळ्या जगाचे त्याकडे लक्ष लागले होते. विक्रम साराभाई यांनाही अवकाश विज्ञानात रस वाटू लागला. त्यामुळे देशात जाऊन अवकाश विज्ञानात काहीतरी करायचं हे स्वप्न घेऊन ते मायदेशी परतले. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांची भेट घेतली आणि काही दिवसांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ सुरू झाली. दरम्यान, किशोरवयात असताना विक्रम साराभाई अहमदाबादहून उटीला जाताना मद्रासला (आताचे चेन्नई) स्वामीनाथन कुटुंबीयांच्या घरी काही काळ राहिले होते. सुब्बराम स्वामीनाथन हे मद्रासचे सुप्रसिद्ध बॅरिस्टर होते. त्यांची पत्नी स्वातंत्र्यसैनिक होती. या कुटुंबातील एक कन्या लक्ष्मी सहगल स्वातंत्र्याच्या सशस्त्र लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होती. त्या भारतीय राष्ट्रीय सैन्यात महिला विभागाच्या प्रभारी होत्या. तर दुसरी कन्या मृणालिनी (Mrinalini) जी साराभाई यांच्यापेक्षा एक वर्षाने मोठी होती, तिला नृत्यात रस होता. विक्रम यांची मृणालिनीशी पहिली भेट इथंच झाली होती. हरणासारखे सुंदर डोळे असलेल्या देखण्या मृणालिनीनं त्यांना दोघांचा एकत्र फोटो काढण्याची ऑफर दिली तेव्हा त्यांना काहीसं विचित्रच वाटलं होतं. पण त्यांच्या त्या भेटीत फार काही घडलं नाही. हे वाचा- Love Story : 40 वर्षीय जिना यांना 16 वर्षीय रूटी म्हणत होती काका, नंतर पडले प्रेमात अन्.. धर्माची बंधनं तोडणारी एक विलक्षण प्रेमकहाणी! काही दिवसांनंतर ती स्वित्झर्लंडमधील डेलफ्रोज शाळेत नृत्य प्रशिक्षणासाठी गेली. 40 च्या दशकात दोघांची पुन्हा भेट झाली. यावेळी मात्र दोघांना एकमेकांविषयी काहीतरी वेगळी भावना जाणवली. त्यानंतर ते पुन्हा बंगळुरूमध्ये भेटले. विक्रम साराभाई यांची तिथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिकवण्यासाठी नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी संस्थेच्या निधी उभारणीसाठी प्रसिद्ध भरतनाट्यम गुरू राम गोपाल यांच्या समूहाला आमंत्रित केले. यामध्ये मृणालिनीही होती. एक कुशल भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून ती हळूहळू ठसा उमटवत होती. त्यांनी सादर केलेली नृत्यनाटिका बघून विक्रम साराभाई खूपच प्रभावित झाले.

मृणालिनी यांनी शांतीनिकेतनमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून नृत्याचे धडे घेतल्यानंतर बेंगळुरू इथं त्यांनी नृत्याचे विशेष प्रशिक्षण घेतले. त्या स्वत: नृत्यात आपल्या पद्धतीने नवनवीन प्रयोग करत होत्या. विक्रम अनेकदा त्याच्या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमांना उपस्थित असत. प्रत्येक कार्यक्रमानंतर त्यांना मृणालिनी यांच्याविषयी अधिक ओढ वाटत असे. शेवटी दोघांच्याही लक्षात आले की, आपण एकमेकांशिवाय राहू शकणार नाही आणि 1942 मध्ये त्यांचे लग्न झाले. मात्र, त्यांचे लग्न कधी झाले, याची माहितीही विक्रम यांच्या घरच्यांना नव्हती. प्रसिद्ध पत्रकार खुशवंत सिंग (Khushwant Sing) यांनी त्यांच्या स्तंभात मृणालिनीबद्दल लिहिले होते की, ती अनेकदा लंडनला तिच्या दर्पण ग्रुपसोबत शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम करण्यासाठी येत असे. तेव्हा भारतीय उच्चायुक्तांकडून त्यांचे जोरदार स्वागत होत असे. शोला फारशी गर्दी नसली तरी इंग्लिश मीडिया मात्र खूप कौतुक करत असे. त्याकाळी ब्रिटन आणि युरोपमध्ये तिला भारताची ‘डान्सिंग आयकॉन’ म्हटले जायचे. लग्नानंतर मृणालिनी यांना दोन मुले झाली. मुलगा कार्तिकेय आणि मुलगी मल्लिका. आई झाल्यानंतरही त्यांची नृत्य साधना, कार्यक्रम सुरूच होते. त्या विदेश दौऱ्यावर जात असत. दरम्यान, काही वर्षांनी मृणालिनी यांना अचानक कळलं की त्यांची शांतीनिकेतनमधील मैत्रीण कमला चौधरी (Kamala Chaudhari) विधवा झाली आहे. त्या कमला यांना भेटल्या आणि त्यांना अहमदाबादला आपल्या घरी येण्यास सांगितलं. जेणेकरून त्यांना आधार वाटेल. मन मोकळे करता येईल.

कमला यांचे कुटुंब हे हरियाणातील मोठे कुटुंब होते. कुटुंबातील अनेक जण ब्रिटिश राजवटीत प्रशासकीय सेवेत होते. कमला यांचे लग्न एका आयसीएस अधिकाऱ्याशी झाले होते. ते लाहोरमध्ये तैनात असताना दिवाळीच्या रात्री अचानक कोणीतरी त्यांची हत्या झाली. खुशवंत सिंग लिहितात, कमला ही अतिशय सुंदर आणि आकर्षक स्त्री होती. त्यांचे एक स्मित एखाद्याचे मन जिंकण्यासाठी पुरेसे होते. मात्र, पतीच्या निधनानंतर त्यांच्या चेहऱ्यावर सतत दुःखाची छाया दिसत असे. कमला अहमदाबादला आल्यावर साराभाई कुटुंबासोबत राहू लागल्या. मृणालिनी यांनी त्यांना साराभाई शैक्षणिक संस्थांमध्ये सामील होण्याचा आग्रह धरला. त्या काळात विक्रम साराभाई देशातील पहिली वस्त्र संशोधन संस्था उघडण्यात व्यस्त होते. मृणालिनी यांच्या सांगण्यावरून त्यांनी कमलांची मुलाखत घेतली. याच मुलाखतीच्या वेळी त्यांना कमला यांनी प्रभावित केलं. साराभाई यांनी कमला यांना लगेचच वस्त्र संशोधन संस्थेत (Textile Institute) महत्त्वाचे पद दिले. त्या वेगळ्या मोठ्या घरात राहू लागल्या. विक्रम साराभाई आणि कमला यांची संस्थेत जवळपास रोजच भेट होत असे. मृणालिनी डान्स ग्रुप्ससोबत परदेशी दौऱ्यावर असे. या परिस्थितीत कमला आणि विक्रम जवळ आणले. कमला त्यांची पत्नी झाली. हे नाते विक्रम यांच्या मृत्यूपर्यंत 20 वर्षे टिकले. कमला चौधरी

कमला चौधरी

2011 च्या त्यांच्या ‘ए बुक ऑफ मेमरी’ या पुस्तकात सुप्रसिद्ध लेखक आणि मनोविश्लेषक सुधीर कक्कर यांनी या नात्याबाबत विस्तृत लिखाण केले आहे. त्यांनी म्हटले की, विक्रम, मृणालिनी आणि कमला यांच्यातील नात्याचा त्रिकोण खूपच अस्वस्थता निर्माण करणारा होता. आपली फसवणूक झाली आहे असे मृणालिनीला वाटत होते, तर तिच्यामुळे नात्यात तणाव निर्माण होत आहे असे कमला यांना वाटत होते. अशा परिस्थितीत त्यांनी अहमदाबाद सोडून दिल्लीत येण्याचा निर्णय घेतला. विक्रम साराभाई यांनी त्यांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यासाठी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबादमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पंडीत नेहरूंमार्फत जोरदार लॉबिंग करून विक्रम साराभाई यांनी अखेर त्यांनी देशातील दुसरी आयआयएम अहमदाबादमध्ये आणली. कमला चौधरी यांना संशोधन संचालक करण्यात आले. त्यामुळे त्या अहमदाबादमध्ये राहिल्या. कक्कड यांनी या पुस्तकात विक्रम साराभाई यांनी आयआयएमशी संबंधित कोणताही निर्णय कमला यांच्या सल्ल्याशिवाय घेतला नसल्याचे लिहिले आहे. आयआयएम अहमदाबादवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात कमला चौधरी यांनी संस्थेच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली होती. विक्रम साराभाई यांची मुलगी मल्लिका मात्र वेगळेच मत व्यक्त करतात. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, पापा आणि कमला यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते, पण कमला यांना आयआयएममध्ये आणण्याचा निर्णय योग्य नव्हता. कारण त्यामुळे पापांना ही संस्था जशी बनवायची होती, तशी ती झाली नाही, असं मल्लिका साराभाई यांनी म्हटले होते. दरम्यान, विक्रम साराभाई यांच्यासोबतचे आपले नाते प्लुटोनिक प्रेमापेक्षा जास्त होते, असं कमला यांनी कालांतराने कबूल केले. 30 डिसेंबर 1970 रोजी केरळमधील कोवलम इथं विक्रम साराभाईंचा संशयास्पद मृत्यू झाला त्यानंतर कमला अहमदाबाद सोडून दिल्लीला गेल्या. अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून त्यांनी काम केलं. भारतातील फोर्ड फाऊंडेशनचे कामही त्या पहात असत. दिल्ली पब्लिक स्कूल, दिल्लीच्या नियामक मंडळातही त्यांनी काम केले. त्या जिवंत असेपर्यंत दरवर्षी दिल्लीत विक्रम साराभाई मेमोरियल लेक्चर आयोजित करत. 2006 मध्ये त्यांचे निधन झाले. कमला यांच्यासह संबंध असूनही मृणालिनी यांनी विक्रम साराभाई यांच्यासह नाते सोडले नाही. तसंच विक्रम साराभाई यांनीही कुटुंबाला सोडले नाही. मात्र त्यांच्या या प्रेमप्रकरणाची सावली कुटुंबावर कायम राहिली. जेव्हा मृणालिनी साराभाई यांनी त्यांचे आत्मचरित्र (Autobiography) लिहिले, तेव्हा पतीबद्दलच्या सर्व भावनिक आठवणी लिहिल्या. एक श्रेष्ठ, उत्साही प्रतिभावंत अशा या शास्त्रज्ञाने कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासह शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासह देशात अंतराळ संशोधन संस्था स्थापन केली. त्यांच्या या अफाट कर्तृत्वाबद्द्ल त्यांनी भरभरून लिहिले. मला अजूनही विक्रम आवडतात, असंही त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं होतं. अशीही विक्रम साराभाई यांची आगळी वेगळी प्रेमकहाणी अलौकिक प्रेमाची ओळख करून देते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या