6 Pack Band
नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: जगभरात आणि भारतीय समाजात तृतीयपंथीयांना कधीकधी भेदभावाची वागणूक दिली जाते. घरातील लोकांना याबद्दल त्यांच्या अपत्य तृतीयपंथी असल्याचं समजल्यावर अनेक घरात त्याला विरोध होतो, हा आजार आहे असंही अनेकदा त्यांना सांगितलं जातं. मग समाजाबरोबरच तृतीयपंथीय व्यक्तीला घरच्यांकडूनही त्रास सोसावा लागतो. काहीजण या सर्व परिस्थितीवर मात करून उभे राहतात. अशीच कमाल हे 6 तृतीयपंथीय त्यांच्या आयुष्यात करत आहेत. त्यांचा ‘6 पॅक बँड’ बॉलिवूडसह कान फेस्टिव्हलही गाजवत आहे. कोमल जगताप, भाविका पाटील, रविना जगताप, चाँदनी सुवर्णकार, आशा जगताप, फिदा खान यांनी आपल्या गाण्याने अनेकांना वेड लावलं आहे. 2016 मध्ये संगीतकार शमीर टंडन यांनी या सर्व तृतीयपंथीयांना एकत्र आणून त्यांचा बँड तयार केला. आतापर्यंत त्यांची 5 गाणी प्रसिद्ध झाली असून त्याला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. मुख्य म्हणजे बॉलिवूडमधील हृतिक रोशन, अर्जुन कपूर या अभिनेत्यांनी या बँडचं कौतुक केलं आहे. पाकिस्तानी गायक, संगीतकार राहत फतेह अली खान यांनीही या बँडचं आणि गायिकांचं कौतुक केलं आहे. हा बँड बॉलिवूड इंडस्ट्रीतील गेम चेंजर ठरेल असं सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने म्हटलं होतं. (हे वाचा- दारुड्यांनी अर्ध्या रात्री अभिनेत्रीचा केला पाठलाग; गाडी थांबवून गलिच्छ शिवीगाळ ) या बँडनी 2017 मध्ये कान्स फेस्टिव्हलमध्ये आपली कला सादर केली. तिथे असा कार्यक्रम करणारा तो एकमेव भारतीय ग्रुप होता. त्यांनी कान्स ग्रां. प्री. ग्लास लायन्स अवॉर्ड आणि 9 एमव्हीज अवॉर्ड्सही पटकावले. त्यामुळे या बँडचा डंका केवळ भारतातच नव्हे तर जगभर आहे. अशी आहे कोमलची हृदयद्रावक कहाणी तृतीयपंथीयांना समाजात प्रचंड वाईट वागणूक दिली जाते आणि या सहा स्टारही तो त्रास भोगूनच इथपर्यंत पोहोचल्या आहेत. कोमल जगतापचा जन्म पुण्यात झाला. लहानपणापासूनच तिला कुटुंबियांनी आणि समाजानी खूप दुर्लक्षित केलं. पण समाजात सन्मानाने जगण्यासाठी वयाच्या 10 व्या वर्षी घर सोडून पळाली. पण तिला लहानपणापासून गाण्याची आवड होती आणि त्यातच काहीतरी करता येईल अशी आशाही होती. ती पुण्यातल्या तृतीयपंथीयांमध्ये सामील झाली. तिथं आल्यानंतर आपल्याला दुर्लक्षित केलं जातंय असं वाटायचं कमी झालं असं कोमलने सांगितलं. द बेटर इंडिया तिने अशी माहिती दिली होती. नववीपर्यंतचं शिक्षण कोमलने पूर्ण केलं आणि त्यानंतर लोकांच्या घरी सण किंवा बाळाच्या जन्मावेळी गाण्याच्या नाचण्याच्या कार्यक्रमाला जायला लागली. पण तिला याहून मोठी उडी घ्यायची होती. ती म्हणाली, ‘ आम्हाला कुणी नोकरी देत नाही आणि सामाजिक सुरक्षाही नसते. पण यात आमचा काय दोष हे मला अद्याप कळालेलं नाही.’ कोमल मुंबईला गेली तिला भूतनाथ रिटर्न या चित्रपटात आणि सावधान इंडिया या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. तिचं आयुष्य बदलणारी ऑडिशन ठरली ती Y फिल्मसची. यशराज फिल्मचाच एक भाग असेल्या वाय फिल्मसने कोमलची पॅशन आणि गाण्याची क्षमता पाहून 250 जणींमधून तिची निवड केली. वाय फिल्मसना तृतीयपंथीयांनाही एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं होतं. त्यानंतर या बँडमध्ये सामील झाल्यामुळे कोमलचं आयुष्यच बदलून गेलं. (हे वाचा - करण जोहरचा ड्रीम प्रोजेक्ट ‘तख्त’ बंद होणार? वाचा काय आहे कारण) भाविका पाटीलही कुटुंबाला सोडून पळाली आणि हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी करू लागली. पण तिथंही तृतीयपंथी असल्यामुळे तिला भेदभावचा सामना करावा लागला, पण ती या बँडमध्ये आली आणि तिच्या जगण्याला वेगळीच दिशा मिळाली. चाँदनी सुवर्णकारलाही समाजाचा त्रास भोगावा लागलाच पण तिला तिच्या कुटुंबीयांचा पाठिंबा होता असं तिनी हिंदूस्थान टाइम्सला सांगितलं. हा बँड जगभर गाजून आला आहे आणि या 6 तृतीयपंथीयांना बॉलिवूडमध्ये आणखी काम करण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळेच त्या नवनवीन संधी शोधत आहेत.