मुंबई, 25 मे: गेल्या काही दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. कोरोनील या औषधामुळे देखील त्यांच्या नावाची चर्चा होत होती. दरम्यान आता आणखी एक धक्कादायक वक्तव्य केल्यामुळे बाबा रामदेव टीकेचे धनी होत आहे. यावेळी थेट त्यांनी कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टरांबाबत विधान केलं आहे. योगसाधना करताना त्यांनी त्यांच्याबरोबर योग करणाऱ्यांशी गप्पा मारताना हे विधान केलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. दरम्यान ज्या डॉक्टरांना देव मानलं जात आणि कोरोना काळात तर देशातील प्रत्येक भागात असंख्य डॉक्टरांनी त्याग केला आहे, अशा परिस्थितीत डॉक्टरांबाबत असं विधान करणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. हे वाचा- कोरोनाची तिसरी लाट खरंच लहान मुलांसाठी घातक?आरोग्य मंत्रालयाच्या उत्तरानं दिलासा काय म्हणाले बाबा रामदेव? एक हजार डॉक्टर कोरोना लशीचे दोन्ही डोस घेऊनही मेले आहेत. जे स्वत:ला वाचवू शकले नाहीत ते कसले डॉक्टर असा सवाल रामदेव बाबांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, ‘तिसरा म्हणाला की त्याला डॉक्टर व्हायचं आहे. टर…टर…टर…टर…टर…टर… टर बनायचं आहे.. डॉक्टर बनायचं आहे. 100 डॉक्टर तर आता कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मरण पावले. किती डॉक्टर? एक हजार… कालची बातमी आहे. जे स्वत:लाच वाचवू शकत नाहीत हे कसले डॉक्टर? डॉक्टर बनायचं असेल तर स्वामी रामदेवसारखं बना, ज्याच्याकडे कोणतीही डिग्री नाही आहे आणि तरी सगळ्याचा डॉक्टर आहे. पदवीशिवाय मी प्रतिष्ठेसह एक डॉक्टर आहे.’
काँग्रेस प्रवक्त्या डॉक्टर रागिणी नायक (Ragini Nayak) यांनी हा व्हिडीओ शेअर करत रामदेव बाबांबद्दल टीका केली आहे. त्या असं म्हणाल्यात की, ‘हे ढोंगी रामदेवचं म्हणणं आहे. जर तुम्ही अशा खोट्या, निर्लज्ज आणि असंवेदनशील पद्धती बोलणाऱ्याविरोधात आहात तर मोदी सरकारला निक्षून सांगा की बाबा रामदेव यांना अटक करा’. त्यांनी #ArrestRamdev असा हॅशटॅग देखील वापरला आहे. अॅलोपॅथीबाबत काय म्हणाले होते बाबा रामदेव? योगगुरु रामदेव यांनी कोरोना मृत्यूमागे अॅलोपॅथी औषधोपचार कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. कोरोना रुग्णांवर अॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. त्यांच्या या विधानामुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पंतजली योगपीठने योगगुरु रामदेव यांचं तशी भावना नसल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देखील याप्रकरणी हस्तक्षेप केला होता. यासंदर्भात त्यांनी योगगुरू रामदेवबाबा यांना पत्र लिहूम रामदेव बाबांना वादग्रस्त विधान मागं घेण्यास सांगितलं होतं. हे वाचा- मोठी कारवाई; कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा भांडाफोड रामदेव यांना लिहिलेल्या दोन पानांच्या पत्रात डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका करणं दुर्दैवी आहे. आपल्या वक्तव्यामुळे देशवासीय खूप दु:खी झाले आहेत. करोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जणू देवदूत आहेत. अशा वेळेत आपण करोना योद्ध्यांचा अपमान केल्यानं खूप दु:ख झालंय. आपण जे स्पष्टीकरण दिलंय तेवढ्यानं वेदना, दु:ख शमणार नाही.