जयपूर, 19 फेब्रुवारी : काही घटना खूप छान असतात. या घटनांमुळे या जगात आजही माणुसकी शिल्लक आहे याची शाश्वती मिळते. या घटनांमधील माणुसकीचा वाहता झरा पाहून खूप समाधान वाटतं. तशीच काहिशी घटना राजस्थानातून समोर आली आहे. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात एका महिलेच्या दोन मुलींचं लग्न होतं. या महिलेला सख्खा भाऊ नाही. पण लग्न म्हटलं की नवरदेव-नवरीच्या मामाची हजेरी ही लागतेच. मामाची हीच कमतरता भासवू नये म्हणून आख्खं गाव महिलेचं भाऊ बनून लग्नात सहभागी झालं. विशेष म्हणजे गावातील या सर्व भावांनी मिळून आपल्या भाचींना लग्नात 4 लाखांची रक्कम भेट म्हणून दिली. गावकऱ्यांचं एवढं प्रेम बघून महिलेला अश्रू अनावर झाले. नेमकं प्रकरण काय? लग्न कार्यक्रमात मामाचं महत्त्व किती असतं हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. मंगलाष्टक जेव्हा म्हटल्या जातात तेव्हा नवरदेव आणि नवरी यांच्यात आंतरपाट पकडण्याचा मान हा केवळ मामालाच असतो. पण प्रत्येक प्रांतात लग्नाच्या वेगवेगळ्या परंपरा असतात. काही ठिकाणी आंतरपाठ पकडणाऱ्या मामाला भाचीच्या लग्नासाठी पैसे खर्च करावा लागतो. तिला बक्षीस म्हणून मनापासून मोठी रोख रक्कम देण्याची परंपरा असते. पण एखाद्या मुलीला जर मामाच नसेल तर ती परंपरा किंवा त्या मामाची भूमिका नेमकं कोण निभावेल? अशीच परिस्थिती राजस्थानातील नागौर जिल्ह्यात उपस्थित झाली होती. पण आख्खं गाव या महिलेसाठी एकवेटलं. गावाने माणुसकीचं दर्शन तर घडवलंच आणि लग्नात नवरींना चार लाखांची रक्कम भेट म्हणून देऊन परंपराही जपली. त्यामुळे या लग्नाची देशभरात चर्चा सुरु आहे. ( ‘घरात बसून बांगड्या भरुन बोलण्याचे काम आम्ही करत नाही’, मेटेंचा रोख नेमका कुणावर? ) नागौर जिल्ह्यातील खींवसर गावात हा लग्न समारंभ पार पडला. गावातील संतू नावाच्या महिलेच्या दोन मुलींचं लग्न होतं. या दोन्ही मुलींना सख्खा मामा नाही. त्यामुळे सख्ख्या मामाकडून पार पाडली जाणारी पारंपरिक जबाबदारी कोण पार पाडणार? असा प्रश्न होता. पण गावातील तरुणांनी तो प्रश्न मार्गी लावला. गावातील तरुण तुलसीराम, राधेश्याम, प्रकाश तंवर आणि गिरधारी यांच्यासह अनेक तरुण हे लग्न मंडपात आले. त्यांनी 2 लाख रुपये रोख रक्कम, 2 तोळे सोने आणि 28 तोळे चांदीसह इतर दागिने असा एकूण 4 लाखांची रक्कम लग्नात भेट म्हणून दिली. गावातील तरुणांनी अचानकपणे लग्नात दिलेल्या या भेटीमुळे संतू खूप भावनिक झाली. तिला अश्रू अनावर झाले. तिला खूप आनंद झाला. तिला रडत असताना सर्व तरुणांनी तिला समजवण्याचा प्रयत्न करत आम्ही तुझे भाऊ आहोत, असं ती म्हणाली. खींवसरचे रहिवासी असलेले प्रेमगिरी यांना संतू आणि चंपा या दोन मुली आहेत. प्रेमगिरी यांना मुलगा नसल्याने त्यांची संतू ही मुलगी आपल्या पतीसह याच गावात राहते. प्रेमगिरी यांच्या वृद्धपकाळात त्यांची सेवा करण्यासाठी संतूने पतीसह माहेरी राहणच पसंत केलं आहे. संतूला 5 मुली आणि एक मुलगा आहे. त्यापैकी दोन मुलींचा विवाह नुकताच पार पडला. या लग्नात संतूला मामा नसल्याने आख्खं गाव एकवटलं आणि त्यांनी लग्नाची परंपरा पार पाडली.