नवी दिल्ली, 29 एप्रिल : देशभरात उष्णतेची लाट सुरू असतानाच, कोळशाच्या कमतरतेमुळे उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यूपीमध्ये वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 657 पॅसेंजर गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. औष्णिक वीज केंद्रांसाठी पुरवल्या जाणाऱ्या कोळशाने भरलेल्या मालगाड्यांना सहज मार्ग मिळावा आणि कोळसा वेळेवर पोहोचता यावा, यासाठी या गाड्या रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्रासह देशातील 13 राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे विजेची मागणी झपाट्याने वाढल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय कोळशाच्या टंचाईमुळे अनेक राज्यांमध्ये वीज संकट निर्माण झाले आहे. दुसरीकडे, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, झारखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान या राज्यांतील लोकांनाही वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोळसा संकटावर काय म्हणाले मंत्री प्रल्हाद जोशी? देशातील वीज संकटावर केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, रशियाकडून होणारा गॅस पुरवठा ठप्प झाला आहे. तथापि, औष्णिक ऊर्जा केंद्रात 21 दशलक्ष टन कोळशाचा साठा आहे. तो दहा दिवस पुरेल. कोल इंडियासह, भारतात एकूण 3 दशलक्ष टनांचा साठा आहे. हा 70 ते 80 दिवसांचा साठा आहे. मात्र, सध्याची परिस्थिती स्थिर आहे. सध्या दैनंदिन वापराच्या 2.5 अब्ज युनिट्सच्या तुलनेत सुमारे 3.5 अब्ज युनिट वीजनिर्मिती होते, असे ते म्हणाले. मात्र, मागच्या काही दिवसांत उष्णतेसोबतच विजेची मागणीही वाढली आहे. आमच्याकडे 10-12 दिवसांचा कोळशाचा साठा आहे. मात्र, त्यानंतरही वीज प्रकल्प बंद होण्याची शक्यता नाही. हे वाचा - russia ukraine war : रशियाने डॉल्फिन्सना दिलं खास प्रशिक्षण, अशा प्रकारे करताय नौदलाचं संरक्षण देशभरात विजेची मोठी समस्या : केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आतापर्यंत दिल्लीत आम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिस्थिती स्थिर राखली आहे. संपूर्ण भारतातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आपण सर्वांनी मिळून यावर लवकरच तोडगा काढावा. या समस्येवर तातडीने ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. NTPC म्हणाले - कोळशाची कमतरता नाही एनटीपीसीने सांगितले की, दादरीचे सर्व 6 युनिट आणि उंचाहारचे 5 युनिट पूर्ण क्षमतेने चालू आहेत. आम्हाला सतत कोळशाचा पुरवठा होत आहे. आमच्याकडे सध्या 140000 MT आणि 95000 MT कोळशाचा साठा आहे. ते म्हणाले की, आयात केलेला कोळसाही वापरला जाणार आहे. हे वाचा - Drugs :भारतीय वंशाच्या तरुणासाठी सिंगापूरमध्ये निदर्शनं, लोक उतरली रस्त्यावर वीज संकटाची कारणं कोणती? भाजून काढणारी उष्णता हे वीज संकटामागील प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय, अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनीही अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याची कबुली दिली होती. रशिया-युक्रेन युद्धामुळे कोळशाच्या आयातीवर परिणाम झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. याशिवाय झारखंडमधील कोळसा कंपन्यांची थकबाकी न भरल्यानं कोळशाचं संकट निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे.