दिल्ली, 30 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अहमादाबादमध्ये उपचार सुरू होते. हिराबेन यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी म्हटलं. हिराबेन यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अहमदाबादमध्ये रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल केले होते.
हेही वाचा : PM Narendra Modi Mother : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक, आई हिराबेन मोदी यांचं निधन शानदार शताब्दीचं देवाच्या चरणी विश्रांती असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, आईमध्ये मला नेहमीच एक त्रिमूर्ती दिसली. ज्यात एका तपस्वीचा प्रवास, निष्काम कर्मयोगीचं प्रतिक आणि मूल्यांबद्दल कटिबद्ध जीवन होतं. मी जेव्हा १०० व्या जन्मदिनी आईला भेटलो तेव्हा तिने एक गोष्ट सांगितली ती नेहमीच लक्षात राहते. काम करा बुद्धीने आणि जीवन जगा शुद्धीने असं आईने म्हटल्याची आठवणही मोदींनी सांगितली.