नवी दिल्ली 30 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. त्या 100 शंभर वर्षांच्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. प्राथमिक माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांना 18 जून रोजी 100 वर्षात पदार्पण केलं होतं. PM मोदी नेहमीच आपल्या आईसोबत म्हणजेच हिराबेन मोदी यांच्यासोबत वेळ घालवताना आणि त्यांचा आशीर्वाद घेताना आपल्याला दिसतात. पंतप्रधानांनी आई हीराबेन यांच्या १०० व्या वाढदिवशी त्यांच्यासाठी एक खास ब्लॉगही लिहिला होता. या ब्लॉगचं शीर्षक त्यांनी ‘आई’ असं ठेवलं होतं.मराठी, हिंदी आणि इंग्रजीव्यतिरिक्त अन्य प्रादेशिक भाषांमध्येदेखील हा ब्लॉग लिहिण्यात आला होता. यामध्ये पंतप्रधानांनी आईचं महत्त्व, काही आठवणी आणि आपल्या आयुष्यातील काही किस्से सांगितले होते. . ब्लॉगमध्ये मोदींनी काय लिहिलं - आईची महती सांगताना पंतप्रधान मोदींनी लिहिलं होतं की, ‘आई, हा केवळ एक शब्द नाही. तर जीवनातील ही अशी एक भावना आहे, ज्यामध्ये प्रेम, धैर्य, विश्वास अशा कित्येक गोष्टी समाविष्ट असतात. जगातील कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही देशात, प्रत्येक मुलाला सर्वांत प्रिय व्यक्ती आपली आईच असते. आई केवळ आपल्या शरीराच्या वाढीकडे नाही, तर आपलं मन, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास या गोष्टींच्या विकासाकडेही लक्ष देते. आपल्या मुलांकडे लक्ष देताना आई स्वतःलाही विसरून जाते.’
आईची गौरव गाथा पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिलं, ‘आमच्याकडे तसं तर वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नाही. मात्र, कुटुंबातील नव्या पिढीतील काही मुलांनी माझ्या वडिलांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या वर्षी 100 झाडे लावली होती. आज माझ्या जीवनात जे काही चांगलं आहे, माझ्या व्यक्तीमत्त्वात जे काही चांगले आहे; ती माझ्या आई आणि वडिलांची देणगी आहे. मी आज इथे दिल्लीमध्ये बसलो आहे, तर मला भूतकाळातील कित्येक गोष्टी आठवत आहेत. माझी आई जेवढी सामान्य आहे, तेवढीच ती असामान्यही आहे. अगदी प्रत्येक आई असते, तशीच. आज मी माझ्या आईबद्दल लिहितो आहे, तर वाचताना तुम्हाला वाटेल की अरे, माझी आई पण तर अशीच आहे. माझी आईसुद्धा असंच करायची. हा लेख वाचताना तुमच्या मनात तुमच्या आईची प्रतिमा उभी राहील. आईची तपस्या, तिच्या मुलांना एक चांगली व्यक्ती बनवते. आईची ममता तिच्या मुलांमध्ये मानवी भावना निर्माण करते. आई एखादी व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व नाही, तर ती एक स्वरूप आहे. आमच्याकडे एक म्हण आहे, जैसा भाव तैसा देव. त्याचप्रमाणे आपल्या मनातील भावानुसार, आपण आईचे स्वरूप अनुभवू शकतो.’ साधी राहणी उच्च विचारसरणी; मोदींच्या मातोश्रींच्या प्रकृतीबद्दल आहारतज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं मत मोदींची खंत या लेखात पंतप्रधान मोदींनी आपल्या आयुष्यातील काही किस्सेदेखील सांगितले. लेखाच्या शेवटी त्यांनी लिहिलं होतं की, ‘मी आजही आईला जेव्हा भेटतो, तेव्हा ती म्हणते की “मला मरेपर्यंत कोणाकडून सेवा करून घ्यायची नाही. असंच काम करत करत या जगातून निघून जायची इच्छा आहे.” माझ्या आईच्या जीवन प्रवासात मला देशातील सर्व मातृशक्तीचे तप, त्याग आणि योगदानाचे दर्शन होते. माझी आई आणि तिच्यासारख्या कोट्यवधी महिलांचे सामर्थ्य मी जेव्हा पाहतो, तेव्हा मला विश्वास वाटतो की, भारतातील लेकींना अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. आईचं अस्तित्व नसणं किंवा तिला भेटता न येणं या स्थितीत आपल्याला तिची महती लक्षात येते. तिचं जवळ नसणंच ती किती महान आहे हे समजवून देतं.संघर्षाच्या प्रत्येक क्षणाच्या वरचढ एका आईची इच्छाशक्ती असते. आई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. सार्वजनिकपणे मी याआधी कधीही तुमच्यासाठी एवढं लिहायचं, एवढं बोलायचं धाडस करू शकलो नाही याची खंत वाटते. तुम्ही निरोगी रहा, आम्हा सर्वांवर तुमचा आशीर्वाद कायम असूद्या, हीच देवाकडे प्रार्थना आहे.’