नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) 75 व्या स्वातंत्र्यदिनी (75th Independence Day 2021) लाल किल्ल्यावरुन 2023 पर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस (75 Vande Bharat Express) चालवण्याची घोषणा केली आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने संपूर्ण प्लॅन तयार केला आहे. रेल्वे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रत्येक महिन्याला पूर्ण क्षमतेसह ट्रेनचं प्रोडक्शन सुरू करेल. भारतीय रेल्वे प्रत्येक महिन्याला 6 वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती करेल. अशाप्रकारे 75 वंदे भारत एक्सप्रेस देशातील प्रमुख शहरात सुरू होतील. सध्या दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. पहिली नवी दिल्ली ते वाराणसी आणि दुसरी नवी दिल्ली ते कटरा अशा मार्गावर सुरू आहेत. आता आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती सुरू असून त्या मार्च 2022 पर्यंत तयार केल्या जातील. ट्रायल आणि सीआरएस क्लिअरेन्सनंतरच त्या सुरू केल्या जातील. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2022 पासून मार्च 2023 पर्यंत प्रत्येक महिन्याला 6-6 वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती केली जाईल.
सध्या वंदे भारत एक्सप्रेस केवळ आयसीएफ चेन्नईमध्ये तयार केल्या जात आहेत. परंतु लवकरच या ट्रेन देशातील आणखी दोन कोन फॅक्टरीमध्ये तयार केल्या जाऊ शकतात. येणाऱ्या नव्या ट्रेनमध्ये, काही बदल केले जाणार आहेत. प्रवाशांच्या अधिक चांगल्या सुविधेसाठी बसायच्या जागांध्ये काही बदल केले जाण्याची माहिती आहे.