लखनऊ, 20 फेब्रुवारी: अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir Construction) निर्मितीसाठी सुरू असलेल्या निधी संकलनावर समाजवादी पार्टीनं (Samajwadi Party) भाजपवर टीका केली आहे. त्याचवेळी कारसेवकांवर गोळीबार केल्याचा आरोप असलेले समाजवादी पार्टीचे संरक्षक आणि माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या सून अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी या मंदिरासाठी 11 लाख रुपयांची देणगी दिली आहे. यावेळी त्यांनी मुलायम यांच्या कार्यकाळात कारसेवकांवर झालेल्या गोळीबारावरही मत व्यक्त केले आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी देशभर निधी संकलन मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून अवध प्रांताचे प्रचारक कौशल आणि कार्यवाह प्रशांत भाटीया हे अपर्णा यादव यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी त्यांनी राम मंदिरासाठी 11 लाख रुपयांची देणगी दिली. अपर्णा यादव यांनी त्यानंतर ‘न्यूज 18’ शी बोलताना सांगितले, ‘राम मंदिर हा आमच्या आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यासाठी आम्ही अयोध्येतील राम मंदिरासाठी स्वच्छेनं 11 लाख रुपये दिले आहेत. राम हा देशाचं चरित्र, संस्कार आणि सर्व प्रकारच्या आस्थेचं केंद्र आहे. हे देशाचं मंदिर आहे. प्रत्येकानं या मंदिरासाठी दान द्यायला हवं, असं मला वाटतं. याच भावनेतून मी देखील दान दिले आहेत.’ (हे वाचा : एकेकाळी राम मंदिराच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं; विश्व हिंदू परिषदेच्या ज्येष्ठ नेत्याच्या भावाकडून 11 कोटींचं दान ) कारसेवकांवरील गोळीबारावर म्हणाल्या… अपर्णा यादव यांनी मुलायम सिंह यादव यांच्याकडून अयोध्येतील कारसेवकांवर गोळीबार केल्याच्या आरोपालाही उत्तर दिलं आहे. ‘यापूर्वी जे झालं, ते ज्या परिस्थितीमध्ये झाले ते अत्यंत दु:खद होते. मला त्यावर काही प्रतिक्रिया द्यायची नाही. ते आता घडून गेलं आहे. आज बदललं जाऊ शकत नाही. आपण आजचा विचार केला पाहिजे. आज आम्ही या पैशांचं समर्पण केलं आहे. येणारी पिढी देखील रामाची अनुयायी म्हणून काम करेल.’