Madhya Pradesh: 'या' मंदिरात स्वत: कलेक्टर देवीला दाखवतात 'मदिरे'चा नैवेद्य
उज्जैन, 13 ऑक्टोबर: नवरात्रीच्या (Navratri 2021) काळात कित्येक भाविक उपवास करतात. अनेक जण उपवास करत नाहीत; मात्र मांस-मच्छी-कांदा-लसूण खात नाहीत आणि कटाक्षाने मद्यप्राशनही करत नाहीत. मात्र मध्य प्रदेशात (Madhya Pradesh News Update) उज्जैनमध्ये एक हजार वर्षं पुरातन असलेल्या देवीमंदिरातली प्रथा काही औरच आहे. तिथे नवरात्रीच्या काळात महाअष्टमीच्या मुहूर्तावर देवीला चक्क मदिरेचा नैवेद्य दाखवला जातो. येणाऱ्या भाविकांनाही तीर्थ म्हणून मदिराच दिली जाते. या देवीचं शासकीय पूजन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करून मग परंपरेनुसार अन्य कार्यक्रम पार पडतात. 24 खंबा माता मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. या समारंभाला नगरपूजा असं म्हटलं जातं. या वर्षीही नुकताच हा समारंभ पार पडला. महाअष्टमीच्या निमित्ताने 24 खंबा माता मंदिरात जिल्हाधिकारी आशिष सिंह (Ashish Singh) यांच्या हस्ते आज (13 ऑक्टोबर) शासकीय नगरपूजा झाली. प्राचीन परंपरेनुसार महालया माता आणि महामाया माता यांना आशिष सिंह यांनी मदिरेचा नैवेद्य दाखवला आणि पूजा-अर्चा करून केवळ जिल्ह्यातल्याच नव्हे, तर देशातल्या नागरिकांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. हे वाचा- एकवीरा देवीच्या रुपातून या मराठमोळ्या अभिनेत्रीने वेधलं चाहत्यांचं लक्ष शारदीय नवरात्रात उज्जैनमध्ये (Ujjain Nagarpuja Navratri 2021) नगरपूजेची परंपरा काही हजार वर्षं जुनी आहे. उज्जयिनीचे महान सम्राट विक्रमादित्य प्रजेच्या सुखसमृद्धीसाठी नगरपूजा करायचे, असं मानलं जातं. उज्जैन म्हणजेच प्राचीन अवंतिका नगरी. या नगरीच्या चारही प्रवेशद्वारांवर भैरव आणि देवी विराजमान झालेल्या आहेत. या देवता नगराचं संकटांपासून संरक्षण करतात, अशी श्रद्धा आहे. 24 खंबा माता मंदिरही त्यापैकीच एक आहे. या मंदिरात काळ्या पाषाणांपासून तयार केलेले 24 खांब आहेत. म्हणून त्या मंदिराला 24 खंबा माता मंदिर (24 Khamba Mata Mandir) असं म्हटलं जातं. हे मंदिर महाकाल वनाच्या मुख्य प्रवेशद्वारी असून, त्यात महालया माता आणि महामाया माता (Mahalaya Mata & Mahamaya Mata) विराजमान झालेल्या आहेत. नगराचं संरक्षण करणाऱ्या या देवतांचं पूजन करण्याची प्रथा तेव्हापासूनच चालत आली आहे. हे वाचा- उपवास करूनही ठणठणीत राहाल; Navratri मध्ये फक्त हे पदार्थ खा आताच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा होऊन नगरपूजेचा प्रारंभ होतो. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात नगरातल्या 40 देवी-देवतांच्या आणि भैरव मंदिरांमध्ये मदिरेची धार चढवली जाते. तांब्याच्या कलशात मदिरा घेऊन एक सेवक या सोहळ्याच्या पुढे तालत असतो. त्यातून मदिरेची धार चढवली जाते. या नगरपूजेदरम्यान एकूण 27 किलोमीटर्सचा प्रवास करून मदिरेची धार देवतांना चढवली जाते. दिवसभर सुरू असलेली नगरपूजा रात्री सुमारे आठ वाजता समाप्त होते. अखेरचं देवीपूजन गढकालिका मंदिरात केलं जातं आणि त्यानंतर भैरव मंदिरात नगरपूजा समाप्त होते. त्यानंतर सर्व उपस्थितांनाही तीर्थप्रसाद म्हणून मदिरा दिली जाते.