इंदूर, 01 मार्च: प्रेमाला कोणत्याही देशाची सीमारेषा, धर्म, जात असं कोणतंही बंधन रोखू शकत नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे एका रशियन मुलीच्या (Russian Girl and Indian Boy Love Story) आणि भारतीय मुलाच्या प्रेमकहाणीनं. मध्य प्रदेशातली ही घटना आहे. एक रशियन मुलगी आपल्या प्रेमासाठी साता समुद्रापार आपला देश सोडून भारतात आली असून, ती आता इंदूरची (Indore Love Story) सून बनली आहे. या रशियन मुलीचं नाव आहे लीना बारकोलसेव्ह (Leena Barcolsev) आणि मुलाचं नाव आहे ऋषी वर्मा (Rishi Verma). दोघांनी नुकतंच कोर्ट मॅरेज केलं आहे. सध्या मध्य प्रदेशात सर्वत्र या जोडीची चर्चा आहे. (Leena Barcolsev and Rishi Verma Love Story) मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंदूरच्या सप्तश्रृंगी नगरमध्ये राहणारा ऋषी वर्मा हैदराबादमध्ये शेफ म्हणून काम करतो. दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये युरोप दौऱ्यावर (Europe Trip) गेला असताना ऋषीनं रशियात सेंट पीटर्सबर्गला भेट दिली. इथल्या प्रेक्षणीय स्थळाचे फोटो काढत असताना त्याची भेट लीना बारकोलसेव्होशी झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. ऋषीने लीनाला काही फोटो क्लिक करायला सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर ऋषी काही दिवसांनी भारतात परत आला; मात्र दोघांचा संपर्क तुटला नाही. दोघेही फोनवर बोलू लागले. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर काही काळाने ऋषीने व्हिडीओ कॉलवरच अलिनाला प्रपोज केलं. लीनानेही त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि त्याला होकार दिला. हे वाचा- 16 कोटींच्या इंजेक्शनमुळे वाचला सृष्टीचा जीव, या दुर्मीळ आजाराशी सुरू होती झुंज दरम्यान, कोरोना संसर्गामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे दोघेही बराच काळ एकमेकांना भेटू शकले नाहीत. अखेर डिसेंबर 2021मध्ये व्हिसा मिळाल्यानंतर लीना इंदूरला आली. ती भारतात आल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि कोर्ट मॅरेजसाठी अर्ज केला. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी नोंदणी पद्धतीनं दोघांनी लग्न केलं. आता डिसेंबरमध्ये ते पुन्हा हिंदू रीतिरिवाजांनुसार लग्न करणार आहेत. या वर्षाखेरीस आपण हिंदू रीतिरिवाजानुसार विवाह करणार असल्याचं या दोघांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. लीनाने तिला भारतीय खाद्यपदार्थ आणि भारतीय संस्कृतीही खूप आवडत असल्याचं सांगितलं. स्वतः शेफ असल्यानं ऋषी लीनाला विविध प्रकारचे भारतीय खाद्यपदार्थ खिलवतो. लीना देखील आता हळूहळू भारतीय पदार्थ बनवण्यास शिकली आहे. दोघंही मंदिरात जातात. लीना सध्या हिंदीही शिकत आहे. रशियन आणि भारतीय संस्कृतीचा मिलाफ दर्शवणारं इंदूरमधलं हे जोडपं सध्या सर्वांच्या कौतुकाचा विषय बनलं आहे. हे वाचा- Insta वरील BFसाठी एका मुलाच्या आईने पुणे सोडून गाठलं कानपूर, सत्य समजताच… पूर्वीपासूनच भारत आणि रशियात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राज कपूरच्या चित्रपटांना तिथल्या नागरिकांनी दिलेला प्रतिसाद आजही या दोन्ही देशांच्या दृढ सांस्कृतिक संबधांची साक्ष देतो. लीना आणि ऋषी यांची जोडीही दोन्ही देशांच्या सांस्कृतिक मिलाफाचं उत्तम उदाहरण आहे. प्रेमाला कोणतीही सीमारेषा रोखू शकत नाही, हेच या दोघांनी सिद्ध केलं आहे.