JOIN US
मराठी बातम्या / देश / प्रेमाला Love Jihad चा रंग? मुस्लिम प्रियकरासोबत लग्न करण्यास कुटुंबाची मान्यता पण हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांचा आक्षेप

प्रेमाला Love Jihad चा रंग? मुस्लिम प्रियकरासोबत लग्न करण्यास कुटुंबाची मान्यता पण हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांचा आक्षेप

या विवाहाची आमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि धार्मिक कार्यकर्त्यांनी डॉ. मेघा आणि त्यांच्या कुटुंबाला आंतरजातीय विवाहानंतर येणाऱ्या समस्यांबद्दल कल्पना देण्यास सुरुवात केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : गेल्या काही काळापासून लव्ह जिहादचा (Love Jihad) मुद्दा देशात गाजतो आहे. अलीकडेच काही ब्रँड्सनी केलेल्या जाहिरातींमधून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याची टीका करण्यात आली. त्यावरून देशभरात गदारोळ माजला होता. सध्या सोशल मीडियावरही हिंदू (Hindu) आणि मुस्लिम (Muslim) समाजात धार्मिक तेढ वाढवणारे, दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे अनेक संदेश फिरताना दिसतात. त्यातच कर्नाटकातल्या (Karnataka) एका हिंदू कुटुंबातल्या (Hindu Girl) मुलीच्या आंतरजातीय विवाहात चक्क हिंदुत्ववादी नेत्यांनी, तसंच एका हिंदू मठाधिपतींनी हस्तक्षेप केल्याचं समोर आलं आहे. सर्जन असलेल्या एका 23 वर्षीय हिंदू मुलीनं आपल्या मुस्लिम वर्गमित्राशी विवाह करण्याचा निर्णय घेतला असून, तिच्या कुटुंबानं तिला पाठिंबा दिला आहे. दोन्ही घरचे लोक या विवाहासाठी आनंदाने तयार आहेत. असं असतानाही या मुलीने मुस्लिम व्यक्तीशी विवाह करू नये यासाठी प्रयत्न केले जात असून, या कुटुंबाची ही वैयक्तिक बाब सार्वजनिक झाल्यानं त्यांना विवाह पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य कुटुंबाच्या वैयक्तिक निर्णयात हस्तक्षेप करण्याच्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. वाचा :  उत्तर प्रदेशनंतर ‘या’ राज्यात Love Jihad विरोधी कायद्याला मान्यता, पंडित-मौलवी दोघांनाही होणार शिक्षा ही घटना आहे कर्नाटकमधल्या मंगळुरू (Mengluru) इथली. इथल्या एका हिंदू कुटुंबातल्या सर्जन (Surgeon) असणाऱ्या डॉ. मेघा (Dr. Megha) या 23 वर्षीय युवतीनं मुस्लिम वर्गमित्राशी (Muslim Classmate) नातेसंबंध असल्याचं मान्य करत, त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रदर्शित केली. डॉक्टर मेघा ही एकुलती एक मुलगी असल्यानं तिच्या पालकांनी तिच्या निर्णयाचा आदर करून त्यासाठी आनंदाने संमती दिली. डॉ. मेघा यांचा डॉ. जाफर हा मुस्लिम वर्गमित्र केरळमधल्या (kerala) कन्नूर इथल्या मुस्लिम कुटुंबातला मुलगा आहे. दोन्ही कुटुंबांनी आपल्या मुलांच्या विवाहाला आनंदानं संमती देऊन 29 नोव्हेंबरला कन्नूरमधल्या पायंबलम इथल्या अरेबियन बीच रिसॉर्टमध्ये विवाहसोहळा करण्याचं निश्चित केलं; मात्र या विवाहाची आमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि धार्मिक कार्यकर्त्यांनी डॉ. मेघा आणि त्यांच्या कुटुंबाला आंतरजातीय विवाहानंतर येणाऱ्या समस्यांबद्दल कल्पना देण्यास सुरुवात केली. अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी (Hindutvavadi Leaders) डॉ. मेघा आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मुस्लिम व्यक्तीशी लग्न न करण्याचा सल्ला दिला. अर्थात डॉ. मेघा आणि तिचे कुटुंबीय आपल्या निर्णयावर ठाम असून, तिच्या पालकांनी या लग्नाला विरोध करण्याचं स्पष्टपणे नाकारलं आहे. वाचा :  तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा Love Jihad चा आरोप अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी डॉ. मेघा आणि तिच्या कुटुंबीयांना हे लग्न करू नये हे पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी श्री वज्रदेही मठाचे श्री राजशेखरानंद स्वामीजी यांनामध्ये आणलं. श्री राजशेखरानंद स्वामीजी यांनी डॉ. मेघा आणि तिच्या पालकांची नुकतीच भेट घेतली आणि तासभर त्यांच्याशी चर्चा केली. वेगळ्या धर्मातल्या पुरुषाशी लग्न केल्यास डॉ. मेघा यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, हे त्यांनी तपशीलवार सांगितलं. ‘अशा चुकीच्या निर्णयांमुळे ज्या महिलांना त्रास सहन करावा लागला त्याची अनेक उदाहरणं आम्ही तिला दिली आहेत. आम्ही जे बोललो ते तिला पटलं असावं, असं वाटत आहे,’ असं स्वामीजींनी म्हटलं आहे. वाचा :  लव्ह जिहाद कायदा लागू होताच तीन दिवसांत पहिला गुन्हा दाखल; आरोपी अटकेत डॉ. मेघा यांचे वडील मोहन यांनी सांगितलं, की ‘आम्ही त्या मुलाच्या म्हणजे डॉक्टर जाफर याच्या कुटुंबाला भेटलो आहोत. ते अत्यंत सुसंस्कृत कुटुंब असून, ते चांगलं कुटुंब आहेत. त्यांना धर्माचा काही प्रश्न नाही. आमच्या मुलीला धर्मांतराची गरज नाही आणि ती तिचा धर्म पाळू शकते, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. या लग्नात आम्हाला कोणतीही अडचण नाही. खरं तर, आम्ही आनंदाने आमच्या मुलीच्या लग्नाची तयारी करत आहोत.’ या सगळ्या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुलीच्या निर्णयाला तिच्या पालकांचा पूर्ण पाठिंबा असल्यानं त्यांनी हे लग्न रद्द न करता पुढं ढकललं आहे. आता हे लग्न नियोजित तारखेला न करता वेगळ्या दिवशी करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला आहे. देशात हिंदू-मुस्लिम समाजात धार्मिक द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न कोणत्या थराला जात आहेत, याचं हे मोठं उदाहरण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या