sujith-wilson
चेन्नई, 29 ऑक्टोबर : तामिळनाडुतील त्रिची जिल्ह्यात तब्बल 3 दिवस बोरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सुजीत विल्सन असं या चिमुकल्याचं नाव आहे. गेल्या 3 दिवसांपासून त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. तीन दिवसांपूर्वी सुजीत हा बोरवेलमध्ये पडला होता. आज पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेमध्ये बचाव पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, बोरवेलमध्ये पडल्यानंतर बऱ्याच वेळाने सुजीत बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला बाहेर काढणं कठीण जात होतं. यावेळी त्याचा श्वास सुरू होता त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण आज पहाटे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती हाती लागत आहे. मुलाला वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि राज्य पोलिस आणि स्थानिक प्रशासनासह अनेक पथकं काम करत होती. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.
तब्बल 26 फुटांवर सुजीत बोरवेलमध्ये अडकला होता. पण अचानक तो 70 फुट खोल घसरला. अधिकाऱ्यांनी त्याला दोरीच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश न मिळाल्यानं बोअरवेलला समांतर खोदण्यात आलं होतं. तर बचावकार्य सुरु असताना रविवारी तामिळनाडुचे उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यांनी मुलाच्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांना धीर दिला होता. पण आता मुलाच्या जाण्यामुळे विल्सन कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील सुजीत सुखरुप बाहेर यावा यासाठी प्रार्थना केली होती. या ठिकाणी राज्य सरकारचे अनेक मोठे अधिकारी उपस्थित होते. तामिळनाडू सरकारमधील अनेक मंत्रीही घटनास्थळी आले होते.