नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर: कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे (Corona virus new strain) जगभरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सर्व देशांनी प्रवास नियमांवर (International Travel) काही निर्बंध आणण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भारत सरकारने देखील परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. 1 डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नियमांमध्ये बदल करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता प्रवाशांना प्रवासापूर्वी एअर सुविधा पोर्टलवर कोविड-19 आरटी-पीसीआर चाचणीची निगेटीव्ह रिपोर्ट अपलोड करणं बंधनकारक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना येथे कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन समोर आल्यानंतर, भारत आपल्या प्रवास मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करत आहे. ओमिक्रॉन स्ट्रेनच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास निर्बंध शिथिल करण्याबाबत पुन्हा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. हेही वाचा- नव्या व्हेरिएंटसोबत लढण्यासाठी मुंबई पालिकेनं घेतला महत्त्वाचा निर्णय रविवारी, सरकारनं सांगितलं की, 1 डिसेंबरपासून भारतात येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट पोर्टलवर अपलोड करावा लागेल. त्याचबरोबर प्रवाशांना त्यांनी शेवटच्या 14 दिवसांत केलेल्या प्रवासाचा तपशील द्यावा लागेल. विशेष बाब म्हणजे, अलीकडेच भारत सरकारने 15 डिसेंबरपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली जातील, अशी घोषणा केली होती. पण सरकारच्या या निर्णयाच्या एका दिवसानंतरच दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट समोर आला आहे. हेही वाचा- अरे देवा! भारतातही घुसला Omicron? द. आफ्रिकेहून आलेले 2 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह या देशांना भारताने रेड लिस्टमध्ये टाकलं कोविड 19 च्या नवीन व्हेरिएंटची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, इस्रायल, हाँगकाँगमध्ये नवीन विषाणूची सर्वाधिक प्रकरणं नोंदली गेली आहेत. यानंतर आता युनायटेड किंगडममध्येही या विषाणूनं शिरकाव केला आहे. याठिकाणी ओमिक्रॉनचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आली आहेत. भारताने या देशांना आधीच रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. हेही वाचा- Omicron व्हेरिएंटमुळे वाढली चिंता; केंद्रासह अनेक राज्यांची नवी नियमावली सध्या, भारतानं दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग, इस्रायल आणि यूके या देशांचा रेड लिस्टमध्ये समावेश केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं देखील या नवीन स्ट्रेनबाबत चेतावणी जारी केली आहे. तसेच कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट हा अन्य व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगानं पसरू शकतो, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.