पणजी 01 जून : गोव्यात (Goa) घटस्फोटाच्या (Divorce) घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. असं म्हटलं जात आहे, की लग्नानंतर (Marriage) अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच इथल्या लोकांचे घटस्फोट होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारनं आता एक निर्णय घेतला आहे. यानुसार घटस्फोटाच्या घटना रोखण्यासाठी सरकारनं लग्नाच्या आधी समुपदेशन कऱण्याचा निर्णय घेतला. गोव्याचे कायदा मंत्री निलेश काब्राल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की नोंदणी व लग्नापूर्वी 15 दिवसांच्या आत या जोडप्याला समुपदेशनासाठी बोलावलं जाईल. ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना गोव्याचे कायदामंत्री निलेश काब्राल म्हणाले, ‘लग्न मोडणे ही चिंतेची बाब आहे. दोन-चार महिने, एक वर्ष किंवा तीन वर्षांत बरेच घटस्फोट होत आहेत. आमचा विभाग याबाबत खूप चिंताग्रस्त आहे. मात्र, घटस्फोटाची संख्या नेमकी किती आहे, याबाबत काहीही उत्तर काब्राल यांनी दिलेलं नाही. काब्राल यांनी सांगितलं, की गोव्याच्या चर्चमध्ये लग्नाबाबत आधीच समुपदेशन सुरू आहे. परंतु आता इतर धर्मातील लोकांपर्यंतही याचा विस्तार केला जाईल. ते पुढे म्हणाले, ‘आम्ही त्यांना हे सांगायला हवं की एकमेकांसाठी त्यांचं कर्तव्य काय आहे, त्यांच्या मुलांसाठीची त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय आहेत. तसंच सासरच्या लोकांसाठी त्यांनी काय करायला हवं. याचसाठी आम्ही एक छोटासा कार्यक्रम बनवला आहे. यानुसार समुपदेशन क्लासनंतरच त्यांना विवाह प्रमाणपत्र देण्यात येईल. विवाहित प्रियकराने अपहरण करून काढला प्रेयसीचा काटा; धक्कादायक कारण आलं समोर 2011 साली देशातील घटस्फोटाची सर्वात कमी प्रकरणं गोव्यातच नोंदवली गेली होती. गोव्याचे कायदामंत्री म्हणाले, की प्रत्येक महिन्यात होणाऱ्या घटस्फोटांचा अचूक संख्या माझ्याकडे उपलब्ध नाही. मात्र, आधी इतकी प्रकरणं येत नसत. आता घटस्फोटाची संख्या वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आता आपण हे सर्व थांबवण्याचा प्रयत्न करायला हवा.