नवी दिल्ली 24 जून : सोशल मीडियावरून लष्करी अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्पष्ट झालंय. लष्कराच्या गुप्तचर सूत्रांना त्याबाबत माहिती मिळाली असून त्यांनी सर्व अधिकारी आणि जवानांसाठी अलर्टही जारी केलाय. Instagram वरून अशा प्रकारचे प्रयत्न होत असल्याचंही स्पष्ट झालंय. Instagramवरचं ‘Oyesomya’ हे अकाऊंट संशयास्पद असून त्यापासून सावध राहण्याची सूचनाही लष्कराने केली आहे. लष्करी अधिकारी आणि जवानांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून गोपनीय आणि संवेदनशील माहिती काढण्याचे प्रकार आधीही उघडकीस आले आहेत. त्यामुळे लष्कराच्या गुप्तचर विभागाने स्पेशल आयटी सेलही तयार केलाय. हा सेल सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याचं काम करतो. शत्रू देश अशा प्रकारचा वापर करून माहिती मिळविण्याचा कायम प्रयत्न करत असतात.
स्मार्ट फोन्सचा वाढता वापर आणि सोशल मीडियाचा प्रभाव यामुळे सर्व जगच जवळ आलंय. माहिती झपाट्याने दूरवर पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे त्याचा वापर केला जातो. दहशतवादी संघटनाही त्याचा वापर करत असतात. त्यामुळे लष्करी अधिकारी आणि जवानांना कटाक्षाने त्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आलं आहे. शत्रूराष्ट्र पाकिस्तानला सैन्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती पुरवल्याप्रकरणी भारतीय लष्कारातल्या एका कर्मचाऱ्याला मे महिन्यात अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला कर्मचारी मध्य प्रदेशातील महू येथील इन्फंट्री बटालियनमध्ये क्लार्क पदावर कार्यरत होता. भारतीय लष्करातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवण्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली. शत्रूराष्ट्रानं ‘हनीट्रॅप’द्वारे त्याला आपल्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून माहिती काढून घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. केंद्रीय गुप्तचर संस्था, लष्कर गुप्तचर संस्था आणि मध्य प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली होती.