हैदराबाद, 30 नोव्हेंबर : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका डॉक्टर युवतीला सामुहीक बलात्कारानंतर पेटवल्याची घटना घडल्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एका महिलेचा जळालेला मृतदेह त्याच परिसरात सापडला आहे. यामुळे हैदराबाद पुन्हा हादरलं आहे. डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि तिच्या हत्येनंतर जाळण्यात आल्याच्या घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुन्हा त्याच परिसरात अशी घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शमशाबाद परिसरात आणखी एका महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. साइबराबाद पोलिस आयुक्त वीसी सज्जनर यांनी सांगितलं की, शमशाबादच्या बाहेरच्या परिसरात सिड्डुलागट्टा रोडजवळ एका महिलेचा जळालेला मृतदेह शुक्रवारी सापडला आहे. या महिलेचं वय अंदाजे 35 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. प्राथमिक तपासणीनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
याआधी बुधवारी एका 27 वर्षीय डॉक्टर तरुणीचा जळाले मृतदेह आढळला होता. त्यामध्ये पीडीत तरुणीवर बलात्कार करून तिला जिंवत जाळल्याची घटना घडली होती. ट्विटरवर #RIPPriyankaReddy हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. पीडितेला न्याय मिळावा यासाठी ही मोहिम सुरु कऱण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी आरोपींनी पीडितेचं अपहरण केलं आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पण याबद्दल कोणाला काही कळू नये म्हणून तिची हत्या केली. दरम्यान, लवकरच आरोपींना माध्यमांसमोर आणू असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पीडित तरुणी बुधवारी कोल्लारु इथे पशु चिकित्सालयात गेली होती. तिने स्कूटी शादनगर टोल प्लाझाजवळ पार्क केली होती. रात्रीच्या वेळी निघताना गाडी पंक्चर झाल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिने बहिणीला कॉल केला. पीडितेला भीती वाटत असल्यामुळे तिच्या ताईने तिला कॅबने येण्यास सांगितलं. पण तितक्यात मला कोणी तरी मदत करत असल्याचं सांगून पीडितीने फोन ठेवला. त्यानंतर तिचा फोन स्वीच ऑफ झाला. कुटुंबीयांनी टोल प्लाझाच्या परिसरात पीडितेचा शोध घेतला मात्र, ती सापडली नाही. सकाळी शादनगरजवळ तिचा मृतदेह आढळला.