नवी दिल्ली, 27 एप्रिल: भारतात कोरोनाची प्रकरणं वाढत असताना बहुतेक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. अशात आता ऑस्ट्रेलियाहून भारतात परतलेलं एक विमान रिकामीच आलं आहे. या विमानात एकही प्रवासी नाही तर फक्त सामान पाठवण्यात आलं आहे. सिडनीहून (Sydney) दिल्लीला आलेलं एअर इंडियाचं हे (Air India Flight) विमान आहे. सिडनीहून उड्डाण करणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्सपैकी एक सदस्य कोरोना संक्रमित आढळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या (Australia) अधिकाऱ्यांनी प्रवाशांना विमानात जाण्यापासून रोखलं. त्यामुळे मंगळवारी हे विमान प्रवाशांशिवायच भारतात परतलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी एअर इंडियाचं हे विमान दिल्लीहून सिडनीला गेलं. उड्डाणापूर्वी विमानातील क्रू मेंबर्सची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली होती आणि त्यावेळी सर्वांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले. रविवारी सकाळी हे विमान सिडनीला पोहोचलं. तिथं त्यांची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्याचा रिपोर्ट सोमवारी आला. या क्रू मेंबर्सपैकी एक सदस्य कोरोना संक्रमित आढळला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांनी एकाही प्रवाशाला या विमानात चढू दिलं नाही. हे वाचा - IPL खेळण्यासाठी भारतात आलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा धक्का कोरोना संक्रमित आढळलेल्या चालक दलाच्या सदस्याला सिडनीत क्वारंटाइन करण्यात आलं आहे. शिवाय भारतातील कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता ऑस्ट्रेलियाने 15 मेपर्यंत भारतातील सर्व विमानांना आपल्या देशात येण्यापासून बंदी घातली आहे. त्यामुळे आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी भारतात खेळण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर आता ऑस्ट्रेलियात परतण्याचा मोठा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन द गार्डियन या वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले, ‘खेळाडू तिकडे वैयक्तिक प्रवासासाठी गेले आहेत. हा कोणत्याही ऑस्ट्रेलियन दौऱ्याचा भाग नाही, त्यांनी भारतात जायची स्वत:ची व्यवस्था केली, त्यामुळे परतण्याची व्यवस्थाही त्यांनीच करावी.’ हे वाचा - जागतिक आरोग्य संघटनाही देशाच्या मदतीला सरसावली, सद्यस्थितीबाबत व्यक्त केली चिंता दरम्यान मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) खेळाडू क्रीस लिन (Chris Lynn) याने आयपीएल संपल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना मायदेशात परतण्यासाठी विशेष विमानाची सोय करावी अशी मागणी केली आहे. तर या कठीण प्रसंगात आम्ही भारतीयांसोबत आहोत, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं. आम्ही ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि कॉमेंटेटर यांच्या संपर्कात आहोत. भारतातल्या परिस्थितीबाबत आम्ही त्यांच्याकडून माहिती घेत असल्याचं ते म्हणाले.