मालेगावत रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा
नाशिक, 17 नोव्हेंबर : मालेगावात रझा अकादमीच्या (Raza Academy) कार्यालयावर पोलिसांनी छापा (Malegaon Police Raid)) टाकल्याची माहिती समोर आली आहे. या छापेमारीत पोलिसांनी काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्रिपुरा येथील कथित हिंसाराच्या (Tripura Dispute) निषेधार्थ रझा अकादमीने मालेगावात मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेक आणि तोडफोडीमुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या हिंसाचाराच्या (Violence) पार्श्वभूमीवरच आता पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. पोलिसांनी आतापर्यंत अनेक आंदोलकांना अटक (Arrest) केलीय. तसेच या प्रकरणी पोलिसात चार गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
त्रिपुरा येथील कथित हिंसाचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटलेले बघायला मिळाले होते. राज्यातील अमरावतीत तर मोठा हिंसाचार बघायला मिळाला. त्यापाठोपाठ मालेगावमध्ये त्याचे पडसाद उमटले होते. मालेगावातही रझा अकादमीकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी दगडफेक आणि तोडफोड झाली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काही ठिकाणी लाठीचार्ज देखील करण्यात आला होता. या घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच संबंधित घटना पुन्हा घडू नये म्हणून पोलिसांकडून मालेगावसह अमरावतीतही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या हिंसाचाराला जबाबदार ठरणाऱ्यांवर आता पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. हेही वाचा : ‘‘कंगना ही राक्षसी वृत्तीची बाई, सकाळी सकाळी बाईचं नाव घेऊ नये’’, किशोरी पेडणेकर भडकल्या
मालेगाव शहरातील रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी मंगळवारी (16 नोव्हेंबर) रात्री छापा टाकला. पोलिसांनी कार्यालयाची झडती घेतली. यावेळी पोलिसांनी काही कागदपत्रे जप्त केली. तसेच पोलिसांनी या प्रकरणी वेगवेगळे 4 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या हिंसाचार प्रकरणी जवळपास 35 संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा- मोठी बातमी: अभिनेता अनिकेत विश्वासरावची पत्नीला मारहाण, गुन्हा दाखल
मालेगाव सारखंच अमरावतीत मोठा गदारोळ झाला होता. विशेष म्हणजे अमरावतीत 12 नोव्हेंबरला रझा अकादमीच्या निषेध मोर्चानंतर 13 नोव्हेंबरला भाजपकडून बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला देखील हिंसाचाराचं वळण लागलं होतं. त्यामुळे पोलिसांकडून कडक कारवाईला सुरुवात झाली. अमरावतीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता तिथे गेल्या चार दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. तसेच शहरातील इंटरनेट सुविधा देखील बंद आहे. याशिवाय या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत भाजपच्या 14 नेते आणि पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यामध्ये भाजप नेते आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांचाही समावेश होता. पोलिसांनी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती.