नागपूर, 04 ऑगस्ट: ‘फ्रेंडशिप डे’च्या (Friendship Day) दिवशी झालेल्या वादातून 6 जणांनी आपल्या जीवलग मित्राची निर्घृण हत्या (Friends Brutal Murder) केली आहे. ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी किरकोळ कारणातून झालेल्या वादानंतर, आरोपींनी काल रात्री नियोजनपूर्व पद्धतीनं काटा काढला आहे. आरोपींनी काल रात्री नागपूरातील हिवरी नगर भागात तरुणाला बोलवून त्याच्यावर घातक हल्ला (Attack on friend) केला आहे. यानंतर आरोपींनी दुखापत झाल्याचं बनाव रचत त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तत्पूर्वी त्याची प्राणज्योत मालवली होती. अनिकेत भोतमांगे असं हत्या झालेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव असून तो विंडो फ्रेमिंगचं काम करायचा. दरम्यान फ्रेंडशिप डेच्या दिवशी अनिकेतचा त्याच्या अन्य सहा मित्रांसोसबत किरकोळ कारणातून वाद झाला होता. या झालेल्या वादाचा राग मनात धरून संबंधित सहा मित्रांनी अनिकेतच्या हत्येचा कट रचला. फ्रेंडशिप डेच्या दिवशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी अनिकेतला काल रात्री नंदनवन पोलीस ठाण्याच्या परिसरातील हिवरी नगर भागात बोलावलं. हेही वाचा- अश्लील शेरेबाजी करत कपडे फाडण्याचा प्रयत्न; तरुणींसोबत टोळक्याचं विकृत कृत्य याठिकाणी आरोपींनी अनिकेतवर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये अनिकेतला गंभीर दुखापत झाली. यानंतर आरोपींपैकी एका मित्राने रात्री उशीरा अनिकेच्या वडिलांना फोन करून, अनिकेतला दुखापत झाल्याची माहिती दिली. तसेच दुखापत झाल्यामुळे अनिकेतला नागपूरातील मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असल्याचा बनाव देखील रचला. मुलाला दुखापत झाल्याची माहिती मिळताच अनिकेतच्या वडिलांनी तातडीनं मेयो रुग्णालयात धाव घेतली. पण याठिकाणी अनिकेतची हत्या झाल्याचं कळताच वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. वडिलांनी रुग्णालयातच टाहो फोडला. हेही वाचा- इमारतीवरून नवजात बालिकेला फेकलं; विरारमधील क्रूरतेचा कळस गाठणारी घटना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत अनिकेतच्या सहा मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत काही तासांतच पाच आरोपींना बेड्या ठोकल्या. एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास नंदनवन पोलीस करत आहेत.