उद्धव यांना आणखी एक मोठा धक्का बसणार!
मुंबई, 22 फेब्रुवारी : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा त्रास संपण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. शिंदे गट पुन्हा एकदा उद्धव गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिंदे गट आता बीएमसीमधील शिवसेना कार्यालय आणि दक्षिण मुंबईतील शिवालय या पक्षाच्या कार्यालयावर दावा करण्याच्या तयारीत आहे. शिंदे गटाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार आधी बीएमसीचे शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्याची योजना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गट लवकरच बीएमसी आयुक्तांना पत्र देऊन शिवसेनेच्या कार्यालयावर दावा करणार आहे. सध्या दोन गटातील वादामुळे बीएमसीमधील या कार्यालयाला कुलूप आहे. मात्र, नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून त्यावर हक्क सांगण्याची तयारी सुरू झाली आहे. वाचा - Maha Political Crisis : सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचं पारडं जड, सरन्यायाधीश अखेर स्पष्टच बोलले या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कार्यालयाची सुरक्षा वाढवली असून तेथे पोलीस तैनात केले आहेत. जेणेकरून येथे दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण होणार नाही आणि एकमेकांशी भांडणही होणार नाही. शिवसेनेच्या या कार्यालयाव्यतिरिक्त, मुखपत्र सामनाच्या कार्यालयावर आणि मुंबईतील 227 हून अधिक वॉर्ड कार्यालयांवरही शिंद गटाचा डोळा आहे, जिथे त्यांचा दावा सांगण्याची योजना आहे. याबाबत शिंदे गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर जे काही आवश्यक असेल ते उद्धव गटाकडून घ्यावे लागेल.
नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गट सातत्याने उद्धव यांच्याकडून मालमत्ता हिसकावण्यात मग्न आहे. शिंदे गटाने आतापर्यंत शिवसेनेचे संसदेतील कार्यालय आणि महाराष्ट्र विधिमंडळ कार्यालयावर कब्जा केला आहे. उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या कार्यालयांवर सातत्याने ताबा ठेण्याला चोरी असल्याचे म्हटले. त्याचवेळी शिंदे गटाकडून कार्यालयावर सातत्याने कब्जा सुरू असल्याच्या विरोधात उद्धव गटाच्या वतीने ठाणे पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली आहे. यावरून येत्या काळात शिंदे आणि उद्धव गटातील वाद शिगेला पोहोचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.